मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड यास अटक केल्यानंतर आणि वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांचे संबध उघडकीस आले. त्यातच सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून सातत्याने वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप केले. मात्र दोनच दिवसांपूर्वी भाजपा आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. विशेष म्हणजे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटी दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते याची कबूलीही दिली. त्यावरून शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून टीका केली.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणात या लढ्याच नेतृत्व भाजपा आमदार सुरेश धस करत आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे ते संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देतील असं वाटलं होतं, तेव्हा मला लोकांनी समजावलं की, तुम्ही धसांची बाजू घेऊ नका, ते कधीही पलटी मारतील सुरेश धस आणि वाल्मिक कराड एकच आहेत. ही त्यांच्या स्वार्थाची लढाई आहे. दुर्दैवाने हे सिद्ध होताना दिसत असल्याचा आरोप केला.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, मला वाईट वाटत असून एका विद्यमान आमदाराने देशमुख कुटुंबाच्या अश्रुचां बाजार मांडला. लहान मुले धसांच्या न्यायासाठी धावत होते, जर सुरेश धस यांनी हे कृत्य केले असेल तर देव त्यांना माफ करणार नाही. पाठीत खंजीर खुपसण्याचा आणि खोटारडेपणाचे कृत्य केले असेल तर राज्याची जनता लक्षात ठेवेल, हे पाप आहे, त्याला क्षमा नाही. सुरेश धसांनी असं केलं असेल तर विश्वासघातापेक्षाही पुढचं पाऊल असेल अशी संतप्त प्रतिक्रियाही यावेळी व्यक्त केली.
संजय राऊत म्हणाले की, बीडचे लोक वारंवार सांगत होते की सुरेश धस, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकच आहेत. नाण्याला दोन बाजू असतात पण इथे तीन बाजू आहेत. पण मी विश्वास ठेवला नाही. तरी मला अपेक्षा होती, सुरेश धस असं काही करणार नाहीत. अस कृत्य सुरेश धस यांच्याकडून होणार नाही असेही यावेळी सांगितले.
दरम्यान, भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याचे मान्य केले. धनंजय मुंडे यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झाल्यानंतर सुऱेश धस यांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी भेटल्याचे सांगत मी स्वतः दिवसा त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो होतो, तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटलो, लढा आणि तब्येतीची विचारपूस या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यांच्या विरोधातील लढा सुरुच राहणार असून त्यामध्ये गहजब करण्यासारखे काय आहे असा सवालही प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
Marathi e-Batmya