विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागा वाटपा दरम्यान झालेल्या चर्चेच्या बैठकांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांच्यात शाब्दीक खटके उडाले. त्यानंतर मातोश्रीवरील प्रवेश सोहळ्यानंतर संजय राऊत यांनी काँग्रेसबाबत नाराजी व्यक्त करत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जर जागा वाटपाच्या चर्चेत असतील तर आम्ही बैठकीला बसणार नसल्याचे जाहिर करत जागा वाटपाची चर्चा रखडण्यामागे नाना पटोले हे जबाबदार असल्याचा दावा केला. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांनी आज शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत झालेल्या नाराजी नाट्यावर चर्चा केली.
या बैठकीनंतर संजय राऊत यांनी माहिती देताना सांगितले की, काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांनी आमच्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. महाविकास आघाडीतील राहिलेल्या जागा वाटपाची चर्चा पुढील एक दोन दिवसात पूर्ण होईल आणि त्यानंतर विधानसभेच्या जागा कोण किती लढवणार याची माहिती आम्ही जाहिर करू असे सांगितले.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेससोबतची जागा वाटपाची बोलणी जवळपास पूर्ण झालेली आहे. त्यामुळे काँग्रेससोबतची बोलणी अद्याप बाकी आहे. ती आज उद्यामध्ये पूर्ण होऊन त्यावरही अधिकृत घोषणा करण्यात येईल.
त्यावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी तुमचे काँग्रेससोबतच्या वादाबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीत कोणतेही वाद नाहीत. ज्या काही अडचणी होत्या, त्यासंदर्भात चेन्नीथला आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झालेली आहे. त्यामुळे राहिलेली चर्चा पुढे आज आणि उद्या पूर्ण होईल असे सांगत काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. आमची शिवसेना प्रादेशिक पक्ष आहे. त्यामुळे आम्हाला योग्य तो सन्मान मिळावा इतकीच अपेक्षा असल्याचे सांगत काँग्रेसचे हायकंमाड दिल्लीत बसतात मात्र राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांचे हायकंमाड आणि आमचे शिवसेनेचे हायकंमांड इथेच असतात असे सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
यावेळी काही प्रसारमाध्यमांनी नाना पटोले यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर विचारले असता संजय राऊत म्हणाले की, मी माझ्या राजकीय जीवनात कोणावरही वैयक्तिक टीका टीपण्णी करत नाही. तसेच नाना पटोले यांच्यासंदर्भातही मी कोणतीही टीका टीपण्णी केलेली नाही. त्यामुळे त्यासंदर्भात आमच्यात तितके सौजन्याचे आणि राजकीय भानाचे संस्कार आमच्याकडेही असल्याचे सांगत पुढील बैठकीला जाणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी पांचजन्य या आरएसएस संघाच्या मुखपत्रात बाबा सिद्धीकी यांचे दाऊद इब्राहीमशी संबध असल्याचा दावा करण्यात आला. त्यासंदर्भात विचारले असता संजय राऊत म्हणाले की, ज्यांचे दाऊद शी संबध आहेत ते सर्वजण भाजपात गेले. इतकेच नव्हे तर दाऊदची प्रॉपर्टी मोकळी करण्याचे आणि ती विकत घेणाऱे सर्वजण भाजपात गेले असून ते सर्व आता शुद्ध झाल्याचा टोलाही भाजपाला लगावला.
Marathi e-Batmya