बंडखोर आमदारांबाबत संजय राऊत यांचे आवाहन, तुम्ही येण्याची हिंमत… महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडू पण परत या

शिवसेनेतील नंबर दोनचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांकडून समेटासाठी आणि बंडाळी क्षमविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह इतर सेना आमदारांना २४ तासात मुंबईला परतण्याचे आवाहन केले. तसेच महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास शिवसेना तयार असल्याचे सांगत पण आधी या आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करा असे आवाहन केले.

या साऱ्या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे हे परत येणार की नाही आणि परत न आल्यास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.

सद्यपरिस्थितीत एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार सोबत असल्याचे सांगण्यात येत असून त्यांना समर्थन देणारे अनेक आमदार शिंदे यांना गुवाहटीला जावून मिळत आहेत. त्यामुळे शिंदे गटाचं संख्याबळ वाढताना दिसत आहे.

संजय राऊत म्हणाले, आपण महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडायला तयार आहोत, आपण अत्यंत जबाबदारीने हे विधान करत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. बंडोखर आमदारांबाबात बोलताना ते म्हणाले, महाविकास आघाडीतून शिवसेनेनं बाहेर पडलं पाहिजे आणि वेगळा विचार करायला पाहिजे, अशी इच्छा त्या सर्व आमदारांची असेल. तर त्याआधी त्यांनी महाराष्ट्रात यावं, मुंबईत यावं आणि त्यांची जी मागणी आहे, ती त्यांनी अधिकृतपणे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पुढे मांडावी. त्यांच्या मागणीचा नक्की विचार केला जाईल. पण आधी त्यांनी मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी.

बंडखोर आमदारांना उद्देशून त्यांनी पुढे म्हटलं की, तिथे बसून तुम्ही पत्रव्यवहार करू नका. आपण सच्चे शिवसैनिक आहात, शिवसैनिक असल्याचं तुम्ही सांगता आणि शिवसेना सोडणार नाही असंही तुम्ही सांगता, मग मुंबईत या आणि आपली भूमिका मांडा. आमची भूमिका केवळ सध्याच्या सरकारविषयी आहे. पण महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडायला तयार आहे. तुम्ही येथे येण्याची हिंमत दाखवा, उद्धव ठाकरेंसमोर या, आपली भूमिका मांडा, तुमच्या भूमिकेचा नक्की विचार केला जाईल. २४ तासांत परत या, हे मी जबाबदारीनं सांगतोय. मी हवेत भूमिका मांडत नाहीये, असेही ते यावेळी म्हणाले.

आता या आवाहनानंतर बंडखोर नेते एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागू राहिले आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता महाराष्ट्राचा २०४७ पर्यंत जगातील महत्त्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये समावेश

पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, प्रतिभा, स्वच्छ ऊर्जा, सुव्यवस्थित शहरीकरण, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवरून भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *