अपवादात्मक मतदारसंघात अर्ज दाखल झाले आहेत मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजितदादा पवार यांच्याशी एकत्रित चर्चा झाली आहे. जे – जे मतदारसंघ सोडण्याचे निर्धारित झाले होते त्याठिकाणी एकत्रित काम कसे करता येईल यासाठी युध्दपातळीवर आम्ही प्रयत्न करत आहोत. एक-दोन दिवसात सर्वांची समजूत घालून त्या – त्या मतदारसंघातील वातावरण योग्य पध्दतीने पूरक होईल असा प्रयत्न नक्कीच असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना केला.
पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, आमच्यामध्ये फारशी जागांची संख्या नाही. ९० ते ९५ टक्के जागांवर महायुतीचे उमेदवार म्हणून उत्तमपध्दतीने काम सुरू झाले आहे. आज महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ महालक्ष्मीच्या चरणी नतमस्तक होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे आज संध्याकाळी होणार आहे. त्यामुळे २८८ जागांवर महायुती पूर्ण ताकदीने… संपूर्ण शक्तीने एकत्रित निवडणूक लढत आहोत असेही यावेळी सांगितले.
सुनिल तटकरे पुढे म्हणाले की, आमच्या अपवादात्मक संख्या एबी फॉर्मसंदर्भात आहेत. अन्य ठिकाणी अपक्ष उमेदवार हे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील तर त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करत आहोत. एक – दोन दिवसात नाराजांची समजूत काढण्यात नक्कीच यशस्वी होऊ असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.
पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, देवळाली ही जागा राष्ट्रवादीची असून त्याठिकाणी सरोज अहिरे या आमच्या महायुतीच्या उमेदवार आहेत. हेमंत गोडसे यांच्या ज्या काही भावना असतील. त्याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्की ती समजूत काढण्यात यशस्वी होतील.
शरद पवारसाहेबांच्या कुठल्याच वक्तव्यावर मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही असे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणार नसल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगत बारामतीची जनता सूज्ञ आहे. ३० वर्षात अजित पवार यांनी बारामतीत उभे केलेले प्रचंड काम बारामतीकर नव्हे तर पुणे जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र विसरू शकत नाही किंवा अनुभवत आहे. देशभर बारामती पॅटर्नचे कौतुक होत असते. त्यामधील अजित पवार यांचा जो सहभाग आहे तो सुज्ञ बारामतीकर ठरवतील की, कुणाला प्रतिनिधीत्व करण्याची संधी देऊ मात्र या विधानसभेत प्रचंड फरकाने अजित पवार निवडून येतील असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.
राज ठाकरे यांच्याबाबत बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, राज ठाकरे कधी -कधी त्यांच्या पध्दतीने बोलत असतात. कधी ते विनोद करतात तर कधी मिमिक्री करतात, त्यामुळे त्यांचे बोलणे त्याच अर्थाने घ्यावे. त्यापेक्षा काही वेगळे असेल असे मला वाटत नाही असा जोरदार टोलाही राज ठाकरे यांना लगावला.
कोल्हापूर उत्तर मधील काँग्रेस उमेदवार मधुरिमा राजे घाटगे यांनी उमेदवारी मागे घेतली, त्याबाबत बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, काँग्रेसला लोकसभेला मिळालेले यश किती पध्दतीने डोक्यात गेलेले आहे आणि ते किती जमिनीवर यायला लागले आहे याचे चित्र म्हणजे कोल्हापूरमध्ये काल काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज माघारी घेतला यावरून स्पष्ट दिसत असल्याचा खोचक टोलाही यावेळी लगावला.
Marathi e-Batmya