Breaking News

उदय सामंत यांची माहिती, दावोसच्या सामंजस्य कराराबाबत श्वेतपत्रिका काढणार तीन वर्षात केलेल्या सामंज्यस करारावर श्वेत पत्रिका काढणार

थेट परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राला सलग दोन वर्ष प्रथम स्थानावर ठेवण्याचे काम उद्योग विभागाच्या माध्यमातून झाले असून मोठ्या प्रमाणात परदेशी उद्योग समूह राज्यात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. दावोस येथे गेल्या तीन वर्षांत राज्याने केलेल्या विविध सामंजस्य करारांची (एमओयू),गुंतवणूक प्रकल्पाबाबतची माहिती देणारी श्वेतपत्रिका उद्योग विभाग प्रसिद्ध करणार असल्याचे घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटीच्या अनुषंगाने उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री उदय सामंत बोलत होते. या चर्चेत विधान परिषद सदस्य सचिन अहीर, अभिजित वंजारी यांनी सहभाग घेतला.

मंत्री उदय सामंत म्हणाले की, सलग दोन वर्षापासून महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत प्रथम स्थानावर असून या वर्षी दावोस येथे तीन लाख ७२ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे रत्ने आणि दागिन्यांचा (जेम्स ॲन्ड ज्वेलरी पार्क) मोठा प्रकल्प नवी मुंबई येथे सुरु करण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षात दावोस येथे उद्योग विभागाच्या तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मार्फत आणि इतर विभागांच्यावतीने किती सामंजस्य करार करण्यात आले, त्याची अंमलबजावणी या सर्वांची माहिती देणारी श्वेतपत्रिका उद्योग विभागाद्वारे काढली जाईल, असे सांगून श्री. सामंत यांनी छत्रपती संभाजीनगरपासून जवळच शेंद्रा येथे असलेल्या ऑरिका सिटी अंतर्गत दिल्ली, मुंबई इंडस्ट्रीअल कॉरिडॉअरच्या शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्टयात मोठ्या संख्येने विविध परदेशी कंपन्यांनी भरीव गुंतवणूक करत आपले उद्योग सुरु केलेले आहेत. त्यातून रोजगाराच्या संधी व्यापक प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत, त्यासोबतच अनेक नवीन परदेशी उद्योग समूह या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत असल्याची माहिती यावेळी दिली.

उदय सामंत पुढे बोलताना म्हणाले की, तसेच ऑरिक सिटीमध्ये मोठ्या प्रकल्पांना बाधा न होणारी मुख्य ठिकाणी असलेली जमीन ही एमएसईबीसाठी राखीव ठेवली जाईल. तसेच त्या ठिकाणी होणा-या एमएसईबीला पूरक योजना उपलब्ध करुन दिल्या जातील. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज, चितेगाव, शेंद्रा, बिडकीन येथील एमआयडीसींना एकमेकांसोबत जोडणारा अंतर्गत वाहतुकीसाठीच्या रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव ही तयार असून येत्या महिनाभरातच त्याचे काम सुरु करण्यात येईल. तसेच ऑरिक सिटी पासून ९८० किमी अतंरावर असलेल्या समृद्धी महामार्गाला जोडणा-या रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया ही लवकरच सुरु करण्यात येणार आहे, या ऑरिक सिटीला समृद्धी महामार्गाला जोडणा-या अंतर्गत रस्त्याचा लाभ येथील उद्योजक, उत्पादन वितरणाला मोठ्या प्रमाणात होणार आहे, असे सांगून दक्षिण कोरियाचा ह्युंदाईचा प्रकल्प पुण्यात येत आहे. या कंपनीने चार हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात करण्याचे ठरवलेले आहे. ज्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याची सांगितले.

Check Also

शरद पवार यांचा मार्मिक सवाल, खिशात ७० रूपये तर मग १०० कसे खर्च करणार? अर्थसंकल्प केवळ शब्दांचा फुलोरा असल्याची केली टीका

खिशात ७० रुपये मग १०० रुपये खर्च करणार कसे? हा अर्थसंकल्प म्हणजे शब्दांचा फुलोरा आहे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *