राज्यातील शेतकरी दुष्काळात होरपळत असताना सरकार आणि प्रशासन मात्र स्वतःच्या वेगळ्या दुनियेत व्यस्त आहे. असे असताना राज्यातील शेतकरी संकटात मरतोय तर राज्याचे कृषी मंत्री परदेशात फिरतायत अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कोणतीही मदत सरकारकडून अजून मिळालेली नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी काँग्रेसने दुष्काळ संदर्भात नेमलेल्या विदर्भाच्या समितीची आज बैठक पार पडल्याचे सांगितले.
पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, ५ जून पासून विदर्भात काँग्रेस पाहणी दौरा करून त्यासंदर्भात अहवाल राज्य सरकार पुढे मांडून शेतकऱ्यांसाठी आम्ही मदतीची मागणी करणार असल्याचे सांगितले.
तसेच विजय वडेट्टीवार म्हणाले की, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून कृषी मंत्री बाहेर आहेत, ते बाहेर असताना आयुक्तांची बदली होते. पूर्णवेळ सचिव नाही. खरीप हंगाम तोंडावर असताना बैठक होत नाही. खतांचा तुडवडा आहे, बियाणाचे दर वाढले, बियाण्यांसाठी लोक रांगेत उभे आहेत. या सर्व परिस्थितीवर उपाययोजना करण्याऐवजी सत्ताधारी परदेशात मजा मारत असल्याचा आरोपही यावेळी केला.
राज्य सरकारच्या अनास्थेबाबत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, शेतकरी जगला काय आणि मेला काय या सरकारला काय फरक पडतो ? राज्यातील शेतकऱ्यांप्रती महायुती सरकारची अनास्था यामधून दिसत असल्याची टीकाही यावेळी केली.
https://x.com/VijayWadettiwar/status/1796805953506968011
Marathi e-Batmya