काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरण येथे दहशतवाद्यांनी हल्ला करून २६ पर्यटकांचा बळी घेतला. त्यानंतर भारताने पाकिस्तानबरोबरील सिंधू नदी कराराला स्थगिती दिली. तसेच भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देत सर्व व्हिसा रद्द केले. तसेच वाघा आणि अट्टारी बॉर्डरही बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पीपीपी पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो-झरदारी यांनी सिंधू नदी करार स्थगित करत भारताला इशाराही दिला.
सिंधू पाणी करार स्थगित केल्याने पाकिस्तान संतप्त झाल्याचे संकेत देत, पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे प्रमुख बिलावल भुट्टो-जरदारी यांनी म्हटले आहे की, हा देश सिंधू संस्कृतीचा खरा रक्षक आहे, “एकतर आमचे पाणी किंवा त्यांचे रक्त त्यातून वाहेल” असा इशारा भारताला दिला.
बिलावल भुट्टो-झरदारी म्हणाले की, “सिंधू आमची आहे आणि आमचीच राहील. एकतर आमचे पाणी त्यातून वाहेल किंवा त्यांचे रक्त त्यातून वाहेल,” असा इशारा शुक्रवारी एका जाहीर सभेत दिला.
सप्टेंबर १९६० मध्ये झालेल्या या करारात, सिंधू खोऱ्यातील सहा नद्यांचे पाणी भारत आणि पाकिस्तानमध्ये कसे वापरायचे आणि कसे वाटप करायचे याचे नियमन करण्यात आले आहे. या कराराचे निलंबन केल्यास भविष्यात पाकिस्तानवर भयानक परिणाम होतील कारण तो त्यांच्या ८०% शेती जमिनीला पाणी पुरवतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना बिलावल भुट्टो-झरदारी म्हणाले की, पाकिस्तान किंवा आंतरराष्ट्रीय समुदाय त्यांच्या “युद्ध” किंवा सिंधू नदीचे पाणी वळवण्याच्या प्रयत्नांना सहन करणार नाही. “ते (मोदी) म्हणतात की ते हजारो वर्षे जुन्या संस्कृतीचे वारस आहेत, परंतु ती संस्कृती लरकाना येथील मोहेंजोदारोमध्ये आहे. आम्ही तिचे खरे रक्षक आहोत आणि आम्ही तिचे रक्षण करू,” असेही यावेळी सांगितले.
प्रत्यक्षात, सिंधू संस्कृती प्राचीन काळातील पाकिस्तान आणि पश्चिम भारतातील मोठ्या भागात पसरलेली होती.
"دریائے سندھ ہمارا ہے اور ہمارا ہی رہے گا، اِس دریا سے ہمارا پانی بہے گا یا اُن کا خون بہے گا۔@BBhuttoZardari
#ThanksBBZ pic.twitter.com/LfNVVW9TnT— PPP (@MediaCellPPP) April 25, 2025
या आठवड्याच्या सुरुवातीला बिहारमधील मधुबनी येथील एका सभेत पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या जोरदार भाषणानंतर बिलावल भुट्टो हे त्यांचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्यानंतर दुसरे पाकिस्तानी नेते आहेत ज्यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले.
पाकिस्तानला कठोर संदेश देताना, पंतप्रधान मोदींनी प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांना “पृथ्वीच्या शेवटच्या टोकापर्यंत ओळखण्याची, त्यांचा माग काढण्याची आणि त्यांना शिक्षा करण्याची” शपथ घेतली आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री म्हणूनही काम केलेले बिलावल भुट्टो-झरदारी म्हणाले की, पाकिस्तानने आधीच या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे, ज्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता, परंतु भारत स्वतःच्या सरकारचे अपयश लपविण्यासाठी आरोप करत आहे. भारत बेकायदेशीरपणे सिंधू नदी पाकिस्तानची आहे हे मान्य करणारा करार रद्द करत आहे, असेही सांगितले.
बिलावल भुट्टो-झरदारी यांच्या या वक्तव्यावर, “मूर्ख” म्हणत केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, “पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला… पाकिस्तानला त्याची किंमत मोजावी लागेल. ही फक्त सुरुवात आहे. बिलावल भुट्टो मूर्ख आहे… जर त्याला पाणी मिळाले नाही तर तो असेच ओरडत राहील,” अशी खोचक टीकाही यावेळी केली.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, भारत पाकिस्तानच्या धमक्यांना घाबरणार नाही. “पाकिस्तानला दहशतवाद पसरवण्याशिवाय दुसरे कोणतेही काम नाही… पाकिस्तानचे लोकही अशा विधानांशी सहमत होणार नाहीत,” असे सांगितले.
Marathi e-Batmya