कोकणातील रिफायनरीवरून शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना आव्हान मुख्यमंत्री फडणवीस खोटे बोलत असल्याचा शिवसेनेचा आरोप

नागपूर : प्रतिनिधी

कोकणातील राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या पेट्रोलियम कंपन्यांच्या रिफायनरीच्या स्थापनेकरीता शिवसेनेचे केंद्रीय मंत्री आणि खासदारांनी पुढाकार घेतल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यास २४ तासांचा अवधी उलटत नाही. तोच या रिफायनरीच्या प्रकल्पासाठी शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्याने किंवा खासदाराने पुढाकार घेतला नसून मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य हे धादांत खोटे असून त्याबाबतची सत्य परिस्थिती मांडावी असे आव्हान शिवसेनेने दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनाच दिल्याची माहिती पुढे आली आहे.

नागपूरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांच्या सुयोग या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देत औपचारीक संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राजापूरातील रिफायनरीचा प्रकल्प आणण्यासाठी शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि खासदार विनायक राऊत यांनी पुढाकार घेतल्याची बाब उघड केली.

सद्यपरिस्थितीत याप्रश्नी कोकणातील जनता या प्रकल्पाच्या विरोधात उभी ठाकली असून त्यास स्थानिक शिवसेनेच्या आमदार, खासदारांनीही पाठिंबा दिला. तरीही मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प राजापूरात सुरु करण्यासाठी शिवसेनेचे मंत्री, खासदार पुढाकार घेत असल्याची धादांत खोटी माहिती दिल्याचा आरोप राऊत यांनी लिहिलेल्या पत्रात करण्यात आला आहे.

त्याचबरोबर हा प्रकल्प कोकणात अथवा राजापूरात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना कधी भेटलोच नसल्याचे पत्राद्वारे राऊत मुख्यमंत्र्यांना सांगितले. तसेच याबाबत मी किंवा शिवेसनेच्या मंत्र्याने कधीही संसदेतही प्रश्न उपस्थित केला नसल्याची बाब पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देत याउपर खासदार विनायक राऊत किंवा केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी कधी याबाबत मागणी केल्याची माहिती आपणाकडे उपलब्ध असल्यास ती समोर आणावी असे आव्हान खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

त्यामुळे रिफायनरी प्रकल्पावरून आता थेट शिवसेना विरूध्द भाजपा असा रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

About Editor

Check Also

इराणचा इशारा, हल्ला केल्यास अमेरिका आणि इस्रायल लक्ष्य राहणार सरकार विरोधात इराणमधील निदर्शनात वाढ

इराणमधील सरकारविरोधी निदर्शनांच्या लाटेदरम्यान अमेरिकेने हल्ला केल्यास, अमेरिका आणि इस्रायलला लक्ष्य करण्याचा इरारा इराणने दिला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *