राज्याला पाऊसाने झोडपले! २१३ लोक पूराच्या पाण्यात अडकले एनडीआरएफ, एसडीआरएफच्या मदतीने रेस्क्यू

राज्यात मागील तीन दिवसांपासून असलेल्या पावसाने सोमवारी मुंबईसह राज्याला झोडपून काढले. परिणामी पूर स्थितीत निर्माण झाल्याने पाण्यात अडकलेल्या २१३ लोकांना एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या मदतीने रेस्क्यू केल्याची माहिती, मंत्रालय आपत्कालीन कक्षाने दिली. तसेच पुढील दोन दिवस हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केल्याचे ही सांगितले. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्कालीन कक्षातील राज्यातील पुरस्थितीचा आढावा घेत, तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

राज्यात शनिवारपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. सोमवारीही पावसाचा जोर कायम होता. सकाळपासूनच सुरू राहिलेल्या पावसाने मुंबईसह उपनगर, ठाणे, पुणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, बीड आदी जिल्ह्यात जोरदार बॅटींग केली. मुंबईत सर्वाधिक १३४.४ मिमी, सांताक्रुझ ७३.२ मिमी, पुणे ५४.४ मिमी, रायगड ५१. ९ मिमी., बीडमध्ये ३७.२ मिमी. पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवसभरातील सगळ्या बैठका रद्द करून मंत्रालयातील आपत्कालीन कक्षाला भेट दिली. आपत्कालीन कक्षाचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाण यांच्याकडून पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. दरम्यान मुंबई, पुणे, छ. संभाजीनगर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी शिंदे यांनी संपर्क साधून पूरस्थितीत अडकलेल्या नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले. तसेच आवश्यक त्या तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

बीडमधील आष्टी तालुक्यात तर पूरस्थिती निर्माण झाल्याने ४० लोक पाण्यात अडकले. तर पुण्यातील येऊर हवेलीत १५०, लोणी काळभोरमधील ५, इंदापूरमधील १०, अहिल्यानगर पाथर्डी येथील ४ तर करंजी गावातील १५ लोकांचे एनडीआरएफ व एसडीआरएफ तुकड्यांच्या मदतीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. तर वाशिम जिल्ह्यात वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मंत्रालय आपत्कालीन कक्षाने दिली.

अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने १९ महसूल मंडळातील गावांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. पारनेर तालुक्यातील ३, पाथर्डी ३, श्रीगोंदा ८ आणि कर्जत जामखेड तालुक्यातील ५ मंडाळांचा यात समावेश आहे. काही भागांत मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली. शेतपिकांचे नुकसान झाले असून पाऊस ओसरल्यानंतर पंचनामे केले जातील, अशी माहिती जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, हवामान बदल कृती कार्यक्रमाला मुंबई क्लायमेट वीकमुळे मिळणार वेग देशातील पहिल्या मुंबई क्लायमेट वीकचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांना उत्तर देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कृती आवश्यक असून मुंबई क्लायमेट वीक हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *