मुनगंटीवार म्हणाले, आमच्या चुकीचा एवढा मोठा फायदा घेवू नका काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला इशारा

मुंबईः विशेष प्रतिनिधी

१९६० नंतर सर्वाधिक तूटीचा अर्थसंकल्प मांडून या सरकारने जनतेची घोर निराशा केली आहे. आमच्या सरकारने विकासाचे राजकारण केले. मात्र हे सरकार स्थगितीचे राजकारण करत आहे. त्यावेळी आमच्याकडून झालेल्या चुकीचा इतका मोठा फायदा घेवू नका. कदाचित उद्या तुमच्यातलाच एखादा ज्योतिरादित्य सिंदीया आमच्या सोबत येईल आणि आमचे सरकार पुन्हा येईल. त्यावेळी आम्ही स्थगितीचे नव्हे तर विकासाचे सरकार आणू असा विश्वास माजी अर्थमंत्री सुधीर मुगंटीवार यांनी आज विधानसभेत व्यक्त केला.

अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर त्यावरील चर्चेवेळी ते बोलत होते. अर्थसंकल्पावर काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेला सुरुवात केली. आज प्रश्नोत्तराच्या तासानंतर अध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षांना या चर्चेवर बोलण्याची संधी दिली. त्याला शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतला.काल  विरोधी पक्ष नेत्यांनी चर्चा सुरु केल्यानंतर प्रथेप्रमाणे आज सत्ताधारी पक्षाकडून चर्चेला सुरुवात व्हायला हवी होती. मात्र विरोधी पक्षाला संधी देवून सभागृहाच्या प्रथा-परंपरा आणि नियम मोडले जावू नयेत अशी मागणी त्यांनी केली.

शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनीही त्यांच्या मागणीला दुजोरा देत पाठिंबा दिला. तरीही अध्यक्षांनी सुधीर मुनगंटीवारांना बोलण्याची संधी दिली. यासंधीचा फायदा घेत मुनगंटीवार यांनी शिवसेना आणि अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठविली.  अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पामधून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल असे वाटले होते. राज्याच्या ३६ जिल्ह्यापैकी केवळ ५ ते ६ जिल्ह्यांचा अर्थसंकल्प असून अर्थमंत्र्यांनी केवळ राज्यातील जनतेलाच नाही तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यासोबतच स्वतःचीही फसवणूक करून घेतली. राजकारण हे सन्मानाचे, जनहीताचे असायला हवे. मात्र तुम्ही तर जनतेला फसविले, शिवसेनेच्या वचननाम्यातील केवळ दोन वचनांचाच अर्थसंकल्पात उल्लेख करून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना फसविले. इतकेच नव्हे तर ज्या पक्षामुळे उपमुख्यमंत्री झाले त्या पक्षालाही फसविले,  स्वतःलाही फसविले. त्यामुळे हा अर्थसंकल्प फसवा असल्याचा आरोप त्यांनी केला.

शिवसेनेबरोबरची आमची मैत्री ३० वर्षाची आहे. तर तुमच्या मैत्रीला अजून तीस महिनेही झाले नाहीत असा टोला लगावून ते पुढे म्हणाले की, शिवसेनेच्या शिवभोजन थाळीसाठी अर्थसंकल्पात तरतूद नाही. १० रूपयात ही थाळी ते ही एकाचवेळी देण्यात येणार आहे. जेलमध्ये एका कैद्यासाठी ८८ रूपयांचा खर्च येतो. गुन्हेगार असूनही त्याला सन्मानाची वागणूक मिळते तर दुसरीकडे जनतेला १० रूपयांची थाळी देवून त्यांची चेष्टा करत आहात का असा सवाल त्यांनी केला.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *