शेतकरी धर्मा पाटील यांना मृत्यूनंतरही भरपाईसाठी एक महिन्याची प्रतिक्षा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे लेखी आश्वासन

मुंबईः प्रतिनिधी

धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांची अधिग्रहीत जमिनीची नुकसान भरपाई मिळावी यासाठी दोन वर्षापासून पाठपुरावा करत होते. ही नुकसान भरपाई मिळावी यासाठी मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्नही केला. मात्र कठोर काळजाच्या सरकारला त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांना तातडीने त्यांच्या जमिनीची नुकसान भरपाई द्यावी असे अद्याप वाटत नसून धर्मा पाटील यांचे वारस नरेंद्र पाटील यांना एक महिन्यात नुकसान भरपाईची रक्कम देण्याचे लेखी आश्वासन दिले.

सतत दोन वर्षे पाठपुरावा करून ही जमिनीला योग्य भाव मिळावा याकरीता धर्मा पाटील यांनी राज्य सरकारचा कारभार हाकण्यात येणाऱ्या मंत्रालयात खेटे मारले. मात्र प्रशासनाचा लालफितीचा कारभार आडवा येत राहीला. त्यामुळे धर्मा पाटील यांनी मंत्रालयाच्या आवारात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पाटील यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतरही त्यांना कोणत्या प्रकारे आणि पध्दतीतून नुकसान भरपाई द्यायची याबाबत मंत्रीस्तरावर एकमत न झाल्याने त्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत दिरंगाई होत राहीली. त्यातच प्रशासनासोबत सुरु असलेली धर्मा पाटील यांची झुंज रूग्णालयात संपली.

धर्मा पाटील यांची प्रशासनाबरोबरची झुंज संपलेली असली तरी त्यांच्या नशीबी असलेल्या प्रतिक्षेचा कालावधी अद्यापही संपलेला नाही. पाटील यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ नुकसान भरपाई देणे राज्य सरकारकडून अपेक्षित होते. परंतु राज्य सरकारने त्याबाबत तत्परता दाखविण्याऐवजी नुकसान भरपाई देण्याबाबत शिथिलता दाखविली असून त्याबाबतचे लेखी पत्रही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी नरेंद्र पाटील यांना दिले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र पाटील यांच्याशी व्यक्तीशः चर्चा करून नुकसान भरपाईची रक्कम त्वरीत देण्याचे आश्वासन दिले. मात्र त्याचा कालावधी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केला नाही.

राज्य सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची विरोधकांची मागणी

अधिग्रहीत जमिनीला योग्य भाव मिळावा या मागणीवर राज्य सरकार दरबारी चकरा मारणाऱ्या धर्मा पाटील यांचा मृत्यू प्रकरणी राज्य सरकारवर भारतीय दंड विधान ३०२ खाली गुन्हा दाखल करण्याची मागणी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने करण्यात आली. धर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या असून शेतकऱ्याचा जीव चालला तरी या सरकारच्या हृदयाला पाण्याचा पाझर फुटला नाही. त्यामुळे हे गेंड्याच्या कातडीचे सरकार असल्याचा आरोपही विरोधकांनी यावेळी केला.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांचा विश्वास, जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये… एसटी महामंडळाच्या मुख्यालयात पार पडलेल्या ३१० व्या संचालक मंडळाच्या बैठकीत व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांची नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे. पुढील पाच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *