राज ठाकरेंचा इशारा, हा विषय धर्माचा नाही, पण… राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड पण शिवसेना, मुख्यमंत्र्यांवर एक शब्दही नाही

मी दोन सभा घेतल्या त्यानंतरही ते सगळे इतकं बोलतं आहेत की, थांबायचे नावच घेत नाहीत. मी म्हणालो शरद पवार नास्तिक आहेत. तर त्यांच्याकडून आणि सुप्रिया सुळेंकडून त्यांच्या देवदर्शनाचे, पूजा अर्चाचे फोटो व्हायरल करायला सुरुवात केली. इतकेच नव्हे तर देवळात जाऊन पूजा करत असल्याचेही फोटो व्हायरल करायला सुरुवात केली. केवळ मी बोललो म्हणून असे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सांगत त्याच पध्दतीने भोंग्याचा विषय हा धार्मिक नाही तर सामाजिक असल्याचे सांगत मुस्लिम समुदायाने हे स्पष्टपणे समजून घ्यावे असा गर्भित इशाराही त्यांनी यावेळी दिला.

औरंगाबादेत मराठवाडा मित्र मंडळाच्या मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून राज्यात जाती-जातीमधील द्वेषाचे राजकारण सुरु झाले आहे. शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी कोणी बांधली माहित आहे का? ती समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली. मग त्याकडेही ब्राम्हणांनी बांधली म्हणूनच बघणार का असा सवाल करत मला सांगतात आजोबांची पुस्तके वाचा म्हणून होय मी सगळी पुस्तकी वाचली आहेत. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या विरोधात हिंदू चळवळ सुरु करण्याची मागणी त्यांनीच पहिल्यांदा केली होती. त्यामुळे फक्त आपल्या सोयीचे तेवढेच वाचायचे आणि अपेक्षित असेल तेच घडवून आणायचे असा गंभीर आरोप त्यांनी केला.

जेम्स लेनच प्रकरण पुढे आले तेव्हा तुम्ही केंद्रात कृषीमंत्री होतात. मग नाही आणला त्याला फरफटत महाराष्ट्रात आणि का नाही विचारला जाब त्याला असा सवालही त्यांनी शरद पवारांना यावेळी केला.

आज एक तारीख आहे. उद्या २ आणि परवा तीन तारीख आहे. त्यांच्या सणात मला कोणतंही विष कालवायचे नाही. आणि मला महाराष्ट्रात दंगली घडवायची इच्छा नाही की तशी मला गरजही नाही असे स्पष्ट करत जर या कालावधीत भोंगे उतरविले नाही. तर चार तारखेपासून मस्जिदींसमोर हनुमान चालिसा वाजविणार म्हणजे वाजविणार असा इशारा देत उत्तर प्रदेशात सर्व धार्मिकस्थळावरील भोंगे उतरविले जातात तर मग महाराष्ट्रात का नाही उतरविले जात नाहीत असा सवालही त्यांनी महाविकास आघाडी सरकारला केला.

तुमची वेळ झाली म्हणून तुम्ही रस्त्यावर नमाज अदा करता, कोणी तुम्हाला परवानगी दिली असा प्रक्षभोक सवाल करत तुमची प्रार्थना तुमच्या घरात करा ना असा सूचनाही त्यांनी केली.

जर तुम्ही भोंग्याचा मुद्दा धार्मिक म्हणून घेतला तर आम्हालाही धार्मिकच उत्तर द्यावे लागेल असाही गर्भित इशारा देतानाच त्या परिसरातील मस्जिदीवरून अजाण देण्यास सुरुवात झाली. त्या आवाजामुळे राज ठाकरे हे भलतेच अस्वस्थ झाले आणि त्यांनी पोलिसांना जाहीर विनंती करत म्हणाले, माझ्या सभेच्यावेळी जर अशी अजाण सुरु होणार असेल तर हे चालणार नाही. पोलिसांनी तेथे जावून हे जे काय सुरु आहे ते बंद करा किंवा त्यांच्या तोंडात बोळा कोंबा अशी विनंतीही त्यांनी केली.

जर तुम्हाला सरळ सांगितलेले समजत नसेल तर यामुळे महाराष्ट्रात जी काही परिस्थिती निर्माण होईल मला माहिती नाही असा गर्भित इशाराही देत त्यांना सरळ भाषेत सांगितलेले समजत नसेल तर एकदा होवून जाऊ दे असा गर्भित इशारा देत तुम्ही शांत बसता कामा नये असे आवाहनही त्यांनी केले.

त्याचबरोबर मी मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातही जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, खासगी व धर्मादाय रुग्णालयांना शासकीय आरोग्य योजना राबविणे बंधनकारक विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली माहिती

राज्यातील खासगी व धर्मादाय रुग्णालयांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी करणे बंधनकारक असल्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *