वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने शिवसेनेच्यावतीने आयोजित सभेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका करत अयोध्येत काय सहलीला गेला होतात का? असा सवाल केला होता. त्यास आज भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले, कालची सभा ही मास्टर सभा आहे म्हणून सांगण्यात येत होते. मात्र ती तर लाफ्टर सभा होती अशी खोचक टीका करत कौरवांची सभा काल झाली पांडवांची सभा आज होत आहे. तसेच होय मी त्यावेळी अयोध्येला बाबरी पाडण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी मी नगरसेवक होतो आणि वकीलही झालो होतो. त्यानंतर मी अयोध्येला गेलो होतो. पण तुम्ही कुठे गेला होतात, तुम्ही कुठे होतात असा सवाल करत तुम्ही तर सहलीलाच गेला असाल असे खोचक उत्तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना दिले.
आज(रविवार) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये हिंदी भाषी महासंकल्प सभा झाली. या सभेची सुरूवात सामूहिक हनुमान चालीसा पठणाने झाली. फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.
या सभेसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा आमदार आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, आमदार मंगलप्रभात लोढा, कृपाशंकर सिंह, संजय उपाध्याय, राजन सिंग, खासदार गोपाल शेट्टी, खासदार, मनोज कोटक, आमदार प्रसाद लाड, आमदार विद्या ठाकूर, आमदार जयप्रकाश ठाकूर आदीसंह भाजपा नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
काल छत्रपती संभाजी महाराजांची देखील जयंती होती आणि भगवान नृसिंहाची देखील जयंती होती. स्वराज्याच्या रक्षणासाठी लढणारे छत्रपती संभाजी महाराज आणि ज्यांनी पापींचं पोट फाडलं असे भगवान नृसिंह या दोघांची काल जयंती होती. आम्हाला वाटलं काही तेजस्वी, ओझस्वी ऐकायला मिळेल. काहीतरी असं बोललं जाईल की जे ऐकूण आम्ही हलून जाऊ. मात्र लाफ्टर शो शेवटपर्यंत संपलाच नाही. त्याच गोष्टी आम्हाला ऐकायला मिळाल्या. एकही नवीन गोष्ट आम्हाला ऐकायला मिळाली नाही. कालच्या भाषणात आमचे एक मित्र सांगत होते, शंभर सभांची बाप सभा. खरंच आहे १०० कोणासोबत होते? कौरवांसोबत होते. पांडवासाोबत पाच होते. कौरवांची सभा काल झाली पांडवांची सभा आज होत आहे असा चिमटाही त्यांनी यावेळी काढला.
मी तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितो मला उत्तर द्या, मुंबईत कोविड काळामध्ये भ्रष्टाचार झाला की नाही? दीड लाख लोकांचा मृत्यू झाला की नाही?, पालघरमध्ये साधूंची हत्या झाली की नाही?, वसूलीच्या आड येणाऱ्यांना मनसूख हिरेन बनलं की नाही?, १०० कोटींच्या वसूलीसाठी गृहमंत्री तुरुंगात गेले की नाही?, दाऊदचा मित्र असूनही मंत्रिमंडळात आहे की नाही?, आपल्या मजूर- कामगार बांधवांना अनवानी पायांनी मुंबई सोडावी लागली की नाही?, मुंबईत मेट्रो, रस्त्यांची कामे बंद आहेत की नाही?, यशवंत जाधवची संपत्ती वाढली की नाही? आता मला सांगा एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतरही यापैकी एकाही गोष्टीवरही आपले मुख्यमंत्री बोलले का? आपले मुख्यमंत्री राज्याचे आणि देशातील पहिले मुख्यमंत्री असतील, की अडीच वर्षांमध्ये या महाशयांनी एकही भाषण राज्याच्या विकासावर दिलं नाही, राज्याच्या विषयावर, लोकांच्या समस्येवर दिलं नसल्याची टीका करत कोविड काळचा संघर्ष सुरु होता. त्यावेळी रस्त्यावर कोण होतं? आपले मुख्यमंत्री आले होते का? मुख्यमंत्री आले पण ते ही लाईव्ह आल्याची उपरोधिक टीकाही त्यांनी केली.
आताच आपण हनुमान चालीसा पठण केली. हनुमान चालीसा तर आमच्या हृदयात असते. परंतु हे जे रवी राणा, नवनीत राणा आहेत ना यांना समजतच नाही, की हनुमान चालीसेच्या दोन ओळी उद्धव ठाकरे आणि या सरकारला अगोदरपासूनच माहीत आहेत आणि केवळ त्या दोन ओळींवरच ते काम करत आहेत. कोणत्या दोन ओळी, राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा बिन पैसा रे… यामुळेच २४ महिन्यात ५३ मालमत्ता तयार झाल्या आणि यशवंत जाधवांनी आपल्या मातोश्रींना ५० लाखांचं घड्याळ देखील दिलं. माझा प्रश्न आहे की हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी कधी विचार केला असेल का? की त्यांच्या मुलाच्या राज्यात हनुमान चालीसा म्हणणं राजद्रोह असेल आणि औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणं हा राजशिष्टाचार असेल, त्यांनी कधी विचार केला असेल का? असा उपरोधिक सवालही त्यांनी यावेळी केला.
वाघाचे फोटो काढले म्हणून कुणाला वाघ होता येत नाही. त्यासाठी निधड्या छातीनं आव्हानांचा सामना करावा लागतो. नुसती फोटोग्राफी करून वाघ होता येत नाही, असा टोला फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
उद्धव ठाकरे यांनी नेमका कुठला सामना केला, कोणत्या आंदोलनात होते, कुठल्या संघर्षात होते, असा सवालही त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारत पुढे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारचे गॅजेट काढून बघा महाराष्ट्र संयुक्त लढ्यात भारतीय जनसंघ असल्याची नोंद आहे. तर भारत सरकारचे गॅजेट काढून बघा राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार हे स्वातंत्र्य चळवळीत तुरुंगात गेले होते. त्यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्त्ये तुरुंगात होते. पण आणीबाणीच्या काळात तुम्ही कोठे होतात, तुम्ही आणीबाणीच्या बाजूने होतात इंदिरा गांधीच्या बाजूने होतात अशी आठवण करून देत त्यांना काही इतिहास वाचण्याची सवय नाही. उगीच उठायचं आणि मनात येईल ते बोलायचे आणि काहीही नसलं की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा आरोप करायचा अशी टीकाही त्यांनी केली.
अरे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची हिंमत कुणाच्या बापात नाही. पण आम्हाला मुंबई वेगळी करायचीय ती मुंबई महापालिका तुमच्या भ्रष्टाचारापासून मुक्त आणि वेगळी अशी करायचीय असेही त्यांनी यावेळी सांगत आणि तीला वेगळे करणारचं असा इशाराही दिला.
कालच्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे भोळे होते. पण मी भोळा नाही धूर्त आहे. हो वाघ भोळाच असतो. बाळासाहेब ठाकरे भोळे होते. पण धूर्त कोण असतं, हे तुम्हाला माहीत आहे. मी त्या प्राण्याचं नाव घेणार नाही. कारण त्यांनी पातळी सोडली म्हणून मला पातळी सोडायची नाही. हो, बाळासाहेब ठाकरे वाघ होतेच पण आता देशात केवळ एकच वाघ आहे. आणि त्या वाघाचं नाव म्हणजे नरेंद्र मोदी आहे. शिवसेनेच्या म्हणण्यानुसार मंदिरातील घंटा वाजणारा हिंदू नको, तर आतंकवाद्याला बडवणारा हिंदू पाहिजे. हो आतंकवाद्याला बडणारा हिंदू नरेंद्र मोदी आहे. जवानावर हल्ला झाल्यानंतर सीमेपार जाऊन सर्जीकल स्टाईल करणारा हिंदू नरेंद्र मोदी आहे. त्यांनी सीमेमध्ये घुसून दहशतवाद्यांना मारल्याचे त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीसाने पाय ठेवला असता तरी बाबरी ढाचा खाली आला असता, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. याला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले की, माझ्या पाठीत खंजीर खूपसून तुम्ही माझं राजकीय वजन कमी करू शकत नाही. तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा खाली आणल्याशिवाय मी राहणार नाही. आणि लक्षात ठेवा, बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना मैद्याचं पोत म्हणायचे. त्याच मैद्याच्या पोत्यावर नाक घासून तुम्ही मुख्यमंत्री झाला आहात. त्यामुळे जेवढं वजन वर आहे, त्यापेक्षा दुप्पट वजन खाली आहे, असा त्यांनी यावेळी लगावला.
Marathi e-Batmya