संजय राऊत यांचा खोचक सवाल, फडणवीसांना नेमकी कोणती अडचण…घोटाळेबाज आणि गुंडांची… मुंबईला गेल्यावर कागदपत्रे फडणवीसांकडे पाठविणार

गेल्या काही दिवसांपासून खासदार संजय राऊत सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळातील सदस्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. मंत्री दादा भुसे आणि आमदार राहुल कुल यांच्यानंतर आता संजय राऊतांनी गुलाबराव पाटलांवर ४०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. या आरोपांवरून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्र सोडलं. जळगावात माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी टीका केली.

यावेळी संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस म्हणतात की ते गृहमंत्री झाल्यापासून अनेकांची अडचण झाली आहे. मात्र, त्यांची नेमकी कोणती अडचण झाली आहे? आज राज्याच्या मंत्रिमंडळातील भ्रष्टाचारी आणि गुन्हेगार मोकळे आहेत. ते फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. देवेंद्र फडणवीस हे भ्रष्टाचारी, घोटाळेबाज आणि गुंडांची टोळी चालवत आहेत का? असा खोचक सवालही केला.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, मी मुंबईला गेल्यावर गुलाबराव पाटलांच्या भ्रष्टाचाराची कागदपत्रे उपमुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे. यापूर्वी दादा भुसे, राहुल कुल यांच्या भ्रष्टाचाराची कागदपत्रे त्यांना पाठवली होती. त्यांना यासंदर्भात १० वेळा पत्रही लिहिली. मग फडणवीस नेमके काय करत आहेत? कोणाला टोप्या लावत आहेत? असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना संजय राऊत यांनी मंत्र्यांवरील आरोपांवरून देवेंद्र फडणवीसांना आव्हानही दिलं. शिंदे सरकारच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे फडणवीसांना दिले आहेत. हिंमत असेल तर त्यांनी याप्रकरणाची चौकशी करावी आणि आरोपींवर कारवाई करून दाखवावी, असे ते म्हणाले.
तसेच संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले, राज्यातल्या बंडखोरांच्या सरकारचे डेथ वॉरंट जारी झाले असून त्या वॉरंटवर आता कोणी आणि कधी सही करणार यासाठी आता थांबले आहे. आगामी काळात त्यावर सही झाल्यानंतर हे मिंद्यांचे सरकार कोसळणार असल्याचे भाकितही केले.

About Editor

Check Also

महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार गुणवंत विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के शिष्यवृत्ती

महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *