काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट जैन मुनीचे विधान जैन धर्माच्या अहिंसा तत्वाला छेद देणारे, खुलेआम गुंडगिरी करणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाडांवर तत्काळ कठोर कारवाई करा,

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचे कोणी समर्थन करत असेल तर ते भारतीय संस्कृतीला धरून नाही. अहिंसा हे जैन धर्माचे तत्व आहे, त्यालाच ते छेद देणारे आहे. गांधी हत्येत सात आरोपी होते. त्यातील एक माफीचा साक्षिदार झाला, काहींना शिक्षा झाली. कपूर आयोगाचा अहवाल आहे, दिल्लीच्या लाल किल्ल्यातील न्यायालयाने शिक्षा ठोठावलेली आहे. हा सर्व दस्तावेज असताना जैन मुनीने गांधी हत्येचे समर्थन करावे हे योग्य नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, या भेटीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर साधक बाधक चर्चा झाली, भविष्यातील जी आव्हाने आहेत त्या अनुषंगाने चर्चा झाली. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षात योग्य संवाद रहावा यासाठी ही भेट होती. या भेटीत विधान परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली नाही. काँग्रेस पक्षाची या संदर्भातील भूमिका स्पष्ट आहे, राज्यसभा निवडणूक काँग्रेसने लढवावी व उद्धव ठाकरे हे मविआचे चेहरा आहेत, त्यांनी विधान परिषद लढवावी अशी भूमिका यापूर्वीच जाहीर केलेली असल्याचे सांगितले.

वरळीतील भाजपा मोर्चावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यापेक्षा मोर्चात सहभागी झालेल्या मंत्र्यांवर गुन्हे का दाखल केले जात नाहीत. या मोर्चामुळे वरळी भागात मोठी वाहतूक कोंडी झाली होती, त्यामुळे मोर्चात सहभागी मंत्र्यावरही गुन्हे दाखल करायला पाहिजेत. या मोर्चावर संताप व्यक्त करणाऱ्या महिलेचा व्हीडिओ आम्ही काँग्रेसच्या सोशल मीडियावर दाखवला तर या व्हिडिओचे चित्रिकरण कोणी केले अशी विचारणा करत भाजपाने पत्रकारांना धमक्या दिल्या, या दमदाटीचाही सर्वांनी निषेध केला पाहिजे, असे आवाहनही यावेळी केले.

शेवटी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पुरोगामी कार्यकर्ते व पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी देण्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. ‘पानसरेचे जे हाल केले, ते करू’ म्हणजे थेट खुनाची धमकी देण्यात आली आहे. प्रकाशक प्रशांत आंबी यांना राज्य सरकारने तातडीने सुरक्षा द्यावी. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येत या आमदाराचा देखील सहभाग आहे का? याची चौकशी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून खुलेआम गुंडगिरी करणाऱ्या या व्यक्तीवर तत्काळ कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणीही यावेळी केली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, एल-निनोचा प्रभाव लक्षात घेऊन पाणी जपून वापरा धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत १०१.७७ टीएमसी अधिकचा पाणीसाठा

राज्यातील विविध धरणांमध्ये सुमारे ६५३.६३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *