साधारणतः २००९ सालापासून राज्यातील विधानसभा निवडणूका असतील किंवा लोकसभेच्या निवडणूका असतील परंतु आतापर्यंत राज्यातील निवडणूकीत प्रचाराचा अजेंडा सेट करण्यात भाजपाला यश आले आहे. मात्र २०१९ आणि २०३४ निवडणूकीत राज्यातील विरोधक थोडे भानावर येत निवडणूक कोणतेही असो पण भाजपाच्या अजेंड्यावर निवडणूक लढायची नाही असा निर्धार केलेला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत भाजपाने ४०० पारचा नारा दिला खरा पण त्यांची गाडी २४० वरच अडकली. त्यामुळे भाजपाने पुन्हा घासून पुसून जूनाच परंतु पुन्हा नवा अजेंडा मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणला आहे.
राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वास्तविक पाहता भाजपाचे केंद्रीय नेते किंवा राज्यस्तरीय नेते अजेंडा सेट करण्यात पुढाकार घेतात. यापूर्वी हे काम महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी राहिलेले प्रकाश जावडेकर यांनी प्रत्येक निवडणूकीत केले. मात्र यंदाच्या विधानसभेत महाराष्ट्रातील निवडणूकीचा अजेंडा भाजपासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे असा राग आळवत केल्याचे दिसून लागले आहे. त्यातच पंतप्रधान मोदी यांनीही बटेंगें तो कटेंगेच्या पुढचा मुद्दा एक है तो सेफ है असा नारा देत पुन्हा एकदा उघड उघड मतांच्या धुव्रीकरणाचा अजेंडा योगी आदित्यनाथ यांनी सेट करू पहात असलेला अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न केला आहे.
वास्तविक पाहता केंद्राची अर्थात संपूर्ण भारताची सुरक्षा केंद्रातील भाजपाच्या हाती आहे. महाराष्ट्र हे भारतातील एक विकसनशील राज्य. मग महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीत कोणत्या तरी परकीय भूमीवरील शत्रु राष्ट्रातील दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात येणार असल्याच्या अर्विभात आणि देशातील विशिष्ट समुदायाच्या विरोधात पुन्हा एकदा हिंदू धर्मियांना साद घालण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे स्वतःच्याच देशातील नागरिकांना फक्त इतर धर्मिय म्हणून देश विरोधी ठरविण्याचा हा अश्वाघ्य भाग असल्याचे दिसते. त्यामुळे राज्याच्या निवडणूकीच्या प्रचारात पहिल्या दोनच दिवसात भाजपाकडे मुद्यांची वाणवा असल्याचे चित्र निर्माण झाले.
याशिवाय निवडणूकीच्या निमित्ताने काही भाजपा प्रणित महायुतीने काँग्रेसची गॅरंटी स्किम अयशस्वी ठरल्याचा दावा करत काँग्रेस-महाविकास आघाडीवर शरसंधान करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी एका इंग्रजी दैनिकाने मोदी-शाह जोडगोळी प्रचारात उतरण्याच्या एक दिवस आधी तशा पद्धतीचे वृत्त छापून आणले. मात्र काँग्रेसने काँग्रेस शासित राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मैदानात उतरवित भाजपाच्या आरोपातील तथ्य किती खरे-खोटे याचा आरसा दाखवला. त्यामुळे काँग्रेसच्या विरोधात उगारलेली भाजपाची तलवार दुसऱ्याच दिवशी म्यान करावी लागली. त्यामुळे दिवसभरात ना पंतप्रधान मोदी यांच्याकडून ना गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून त्या गॅरंटीवर बोलण्याचे धाडस झाले नाही. त्यामुळे भाजपाकडून काँग्रेस विशेषतः राहुल गांधी यांच्या संविधान रॅलीत वाटण्यात येणारी संविधानाची पुस्तके आणि जातीय जणगणनेच्या मुद्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. मात्र या मुद्यांचा मतदारांवर फारसा परिणाम पडतोय असे सध्या तरी दिसून येत आहे.
तर तिसऱ्याबाजूला काँग्रेस-महाविकास आघाडीच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या मुद्यावर आणि फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य करत भाजपाला निरूत्तर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसऱ्याबाजूला शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांच्या पक्षाशी गद्दारी केलेल्यांवर आणि भाजपावर टीकेचे आसून लगावणे सुरुच ठेवले आहे. त्यांच्या जोडीला संजय राऊत यांच्याकडून नेहमीप्रमाणे रोज नवा मुद्दा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जनतेत आणत आहेत. त्यामुळे त्यांच्या मुद्यावर अद्याप तरी सत्ताधारी भाजपा-महायुतीपैकी कोणी उत्तर दिल्याचे दिसून येत नाही.
तसेच महाराष्ट्राच्या महिला वर्गात लोकप्रिय? ठरलेली लाडकी बहिण योजनावरून वाढीव रकमेची महालक्ष्मी योजना महाविकास आघाडीकडून जाहिर करण्यात आली. त्याचबरोबर राज्यातील बेरोजगारीच्या प्रश्नावर बेरोजगारीचा भत्ता देण्यासंदर्भातही महाविकास आघाडीने मुद्दा उचलून धरत आरोग्य विम्याच्या प्रश्नावर थेट २५ लाख रूपयांची घोषणा करत भाजपा- महायुतीला चांगलेच निरूत्तर केले आहे. याशिवाय मुलीप्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षण देण्याची घोषणाही केली. त्यामुळे महाविकास आघाडी भाजपा-महायुतीच्या पुढे असल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे या प्रचाराच्या धुळवडीत मुंबईतील हजारो हेक्टर जमीन धारावी पुर्नपसनाच्या नावाखाली अदानीला देणे, आणि पुर्नविकासाचे सर्वाधिकारही देणे यासह, बांधकाम क्षेत्रात टीडीआरला महत्व आहे. त्याची मोनोपॉलीही राज्य सरकारने अर्थात महायुतीच्या सरकारने आयतीच त्याच्या हाती दिली. त्याचबरोबर राज्यातील उद्योग गुजरातला नेऊ देणे, परकीय गुंतवणूक आदी गोष्टीही गुजरातने घेऊन जात असताना महायुतीच्या सरकारने गपगुमान पाहणे या सारखे अनेक मुद्दे महाविकास आघाडीकडून प्रचारात येणे बाकी आहे. कदाचित भाजपाकडून हे मुद्दे उपस्थित केले जाण्याची शक्यता अधिक आहेत. मात्र या मुद्यावर भाजपाला पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर आपल्या प्रचाराचे लक्ष्य साधावे लागेल. नाहीतर उत्तर प्रदेशच्या निवडणूकीत बटेंगेला उत्तर जुडेंगेने निश्चितच मिळण्याची शक्यता जास्त आहे.
लेखन- गिरिराज सावंत
Marathi e-Batmya