धनंजय मुंडे यांची मागणी, स्व.संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीच व्हावी… या घटनेच्या आडून मला सामाजिक व राजकीय आयुष्यातून उठवायचा डाव

मागील जवळपास १५ दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळातील मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिकी कराड याच्यावर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत हात असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच याप्रकरणी धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांच्या कथित संबधावर दररोज नव नवी माहिती उघडकीस येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर बीडचे आमदार तथा मंत्री धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येवरून आणि विरोधकांच्या आरोपावर पहिल्यांदाच आपली भूमिका मांडली.

यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, मस्साजोगचे तरुण सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना व त्यांचे जे कोणी सूत्रधार असतील त्यांना फाशीच दिली जावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची मागणी असून या प्रकरणातील तपास पूर्ण करून तातडीने याची चार्ज शीट दाखल करून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवले जावे व देशमुख यांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळवून दिला जावा ही माझी पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे असेही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

धनंजय मुंडे यांनी आज अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारत विभागाचा आढावा घेतला. सह्याद्री अतिथी गृह येथे संपन्न झालेल्या या आढावा बैठकीनंतर धनंजय मुंडे माध्यमंशी बोलत होते.

पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, बीड जिल्ह्यातील एका तरुण सरपंचाची हत्या झाली, हे प्रकरण अत्यंत दुर्दैवी आणि तितकेच भयानक आहे, त्यामुळे यातील कुठल्याही आरोपीचे, तो कुणाच्याही जवळचा असला तरी समर्थन केले जाऊ शकत नाही, त्यामुळे सरकार म्हणून या प्रकरणांमध्ये कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही तसेच या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्याच्या दृष्टीने पोलिसांचा तपास वेगाने सुरू असल्याचेही यावेळी सांगितले.

दरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले की, या घटनेच्या आडून बीड जिल्ह्यामध्ये अनेक जणांकडून वेगळ्या पद्धतीचे राजकारण केले जात आहे. मला मंत्री पद मिळू नये, पालकमंत्री पद मिळू नये, यासाठी या घटनेचे दुर्दैवी राजकारण केले गेले व यातून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार सातत्याने सुरू आहे. काही जणांचा तर दिवसच माझ्यावर टीका करण्यात व या घटनेशी कसलाही संबंध नसताना तो जोडायचा प्रयत्न करण्यात उजाडतो आहे अशी टीकाही यावेळी केली.

शेवटी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, या घटनेच्या आडून मला सामाजिक व राजकीय आयुष्यातून उठण्याचा काही जणांचा डाव आहे मात्र, ही घटना दुर्दैवी असून त्यातील आरोपींना फाशी मिळावी व खरे सूत्रधार समोर यावेत ही माझी भूमिका आहे व ती पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे. त्यामुळे ज्यांना आरोप करायचे आहेत त्यांना करू द्या, अखेर घटनेतील सत्य व सूत्रधार समोर येईलच, असेही यावेळी स्पष्ट केले.

About Editor

Check Also

विजय वडेट्टीवार यांची टीका, अभिभाषणात जुन्याच मुद्याची घासून पूसून उजळणी राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे आकड्यांची फेकाफेक

राज्यपालांच्या अभिभाषणात कर्जमुक्त शेतकरी, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र दिसला नाही.हे भाषण म्हणजे शब्दांचा बाजार आणि आकड्यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *