नाना पटोले यांचा सवाल, सैफ अली खान प्रकरणी सीसीटीव्ही आणि अटकेतील व्यक्ती एकच का? ‘लाडकी बहीण’चा फायदा घेणारे बांग्लादेशी भारतात आले कसे? नरेंद्र मोदी सरकार कमजोर आहे का?

अभिनेता सैफ अली खानवर त्यांच्या घरातच मध्यरात्री हल्ला झाल्याने मुंबईत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई पोलिसांनी हल्लेखोराला अटक केल्याचे जाहिर केले आहे परंतु CCTV मध्ये दिसलेला हल्लेखोर व अटक करण्यात आलेला व्यक्ती यांच्यात साम्य दिसत नाही असा दावा एका वृत्तपत्राने केला आहे, या प्रश्नी मुंबई पोलिसांनी खुलासा करावा व सत्य जनतेसमोर मांडावे असे आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

टिळक भवनमध्ये पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मुंबईतील सुरक्षित समजल्या जाणाऱ्या वांद्रे भागात अभिनेत्याच्या घरात हल्ला झाल्याने सेलिब्रिटी सुरक्षित नाहीत तसेच गावातील सरपंचही सुरक्षित नाहीत तर राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेचे काय? हा कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न असून निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना महत्वाच्या पदावर बसवून सरकार काम करत आहे, त्याचासुद्धा हा परिणाम आहे. सैफ अली खानवरील हल्ल्याने बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सैफवरील हल्ला हा हिंदू मुस्लीम नसून तो सुरक्षेचा व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, परंतु सत्ताधारी भाजपातील काही लोक त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी भाजपा सरकारनेच सीबीआय चौकशी केली होती, आजपर्यंत सीबीआयने त्यांचा अहवाल दिला नाही. भाजपा सरकार हिंदू सुशांतला न्याय देऊ शकले नाही असेच म्हणावे लागले. कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीतही सत्ताधारी भाजपा धार्मिक अजेंडा राबवत असेल तर हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याची टीकाही यावेळी केली.

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, विधानसभा निवडणुकीवेळी भाजपा युतीने लाडकी बहीण योजनेचा गाजावाजा करत सर्व भगिणींना प्रति महिना १५०० हजार रुपये दिले, पण आता या योजनेचा लाभ चुकीच्या लोकांनी घेतला, या योजनेत त्रुटी आहेत. बांग्लादेशींनीही लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतल्याचा साक्षात्कार सरकारला झाला आहे. योजना सुरु करताना सरकारला त्रुटी दिसल्या नाहीत का? बांग्लादेशींनी या योजनेचा लाभ घेतला तर हे बांग्लादेश भारतात, महाराष्ट्र आले कसे? केंद्रात मागील ११ वर्षांपासून ५६ इंच छातीवाल्या मोदींचे सरकार आहे. मग मोदी सरकार कमजोर आहे, असे भाजपाला म्हणायचे आहे का? असा सवाल करत जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्या सरकारवरच गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी टीकाही यावेळी केली.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *