महाराष्ट्रात झालेली विधानसभा निवडणूक ही मॅच फिक्सिंग होती, या निवडणुकीत नेमकी काय झालं याचं सत्य लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मांडले आहे. दम असेल तर यावर खुलासा करावा असे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्रात निवडणुकीत झालेले मतदान, २०२४ लोकसभा निवडणुकी नंतर विधानसभा निवडणुकीत मतदारांची वाढलेली संख्या आणि महाराष्ट्रात मतदानाची वेळ संपल्यावर अचानक वाढलेली मतदानाची टक्केवारी याबाबत विविध लेखातून भूमिका मांडली आहे. मुळात केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त निवडण्याची प्रक्रियाच सदोष आहे. त्यानंतर विविध यंत्रणांना हाताशी धरून सत्ताधाऱ्यांनी निवडणूक जिंकली असा आरोप करत मतदानाची वेळ संपल्यावर २०२४ विधानसभा निवडणुकीत साडे आठ टक्के सरासरीने मतदानाची टक्केवारी वाढते हे संशयास्पद आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बेईमान पद्धतीने सरकार आलेले आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वस्तुनिष्ठ माहिती दिली आहे, यावर संबंधितांनी खुलासा केला पाहिजे अशी मागणीही यावेळी केली.
पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहे. राज्यातील महाराष्ट्र विरोधी सरकार घालवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर त्याचे आम्ही स्वागत करतो. ठाकरे बंधू एकत्र येण्याची भीती सत्ताधाऱ्यांना का वाटते? त्यांच्या युतीच्या बातम्यांनी सत्ताधारी का अस्वस्थ होत आहेत असा सवालही यावेळी केला.
शेवटी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात सारथी, बार्टी, महाज्योती यांना समान निधी वाटप केल्याचा दावा सरकार करत आहे असे असले तरी सारथीला इमारत आणि हॉस्टेल बांधण्यासाठी अधिकचा निधी दिला आहे. इतर संस्थांना कमी निधी दिला आहे. महाराष्ट्राची तिजोरी ही ओबीसी समाजासाठी नाही का? निवडणुकीत भाजपा ओबीसी समाजाची मत घेते आणि सरकार आल्यावर मात्र त्यांना दुर्लक्ष करते हा अन्याय आहे. सरकारने सर्वांना समान निधी आणि न्याय द्यावा अशी मागणीही यावेळी केली.
Marathi e-Batmya