हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, महाराष्ट्रात मतचोरीचा पहिला प्रयोग कामठीत भाजपाने मतचोरी करून महाराष्ट्रात १३२ आमदार निवडून आणले, मतचोरांना आता जनताच शिक्षा देणार: विजय वडेट्टीवार.

भारतीय जनता पक्ष मतचोरी करून सत्तेत आला आहे. महाराष्ट्रात मतचोरीचा पहिला प्रयोग भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदार संघात झाला. ज्या कामठीत मतचोरीची सुरवात झाली त्या चोराला सर्वात आधी धडा शिकवला पाहिजे. वोट चोर, गद्दी छोड,चा पहिला धमाका कामठीत झाला असून तो देशभर पाहोचला आहे. आता या मतचोरांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने देशभर ‘वोट चोर, गद्दी छोड’, मेळाव्याचे आयोजन केले आहे, त्याअंतर्गत महाराष्ट्रात पहिला राज्यव्यापी मेळावा नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे घेण्यात आला. या मेळाव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, काँग्रेस कार्य समितीच्या सदस्य यशोमती ठाकूर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, प्रफुल्ल गुडदे पाटील, माजी मंत्री सुनिल केदार, नसीम खान, खासदार श्यामकुमार बर्वे, प्रतिभा धानोरकर, प्रशांत पडोले, नामदेव किरसान, बळवंत वानखेडे, आमदार अभिजित वंजारी, नागपूर ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारो लोक उपस्थित होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, कामठीतील मेळावा हा सरकारला इशारा असून लोकशाहीला हात लावाल तर खबरदार. नागपूरमधून ७५ वर्षाच्या नेत्यांना खूर्ची खाली करण्याचे आदेश निघाले आहेत, त्यामुळे मोदींच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि तो दिवस दूर नाही की देशात मध्यावधी निवडणुका होतील आणि शिव, शाहु, फुले व आंबेडकरांच्या विचाराचे नवे सरकार येईल. ‘वोट चोर, गद्दी छोड’ हा काँग्रेसचा नारा असून आता गप्प बसून चालणार नाही. या लढाईत सर्वांनी सहभागी झाले पाहिजे, असे सपकाळ म्हणाले.
विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी भाजपा व रा. स्व. संघावर तोफ डागली, ते म्हणाले की, सरसंघचालक मोहन भागवत प्रत्येक दाम्प्त्याने ३ मुलांना जन्म द्यावा असे सांगतात परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील मतदार यादीत एका घरी ५६ मुले दाखवण्यात आली आहेत आणि १० बाय १० च्या खोलीत १०९ मतदार दाखवले आहेत. भाजपने मतचोरी करून महाराष्ट्रात १३२ आमदार निवडून आणले आहेत. हे भित्रे लोक आहेत, वोट चोरी करून सत्तेत आले आहेत. भाजपाचे लोक एकमेकाला चिमटे घेऊन विचारत होते आपण विजयी झालो का.. कामठीचा सरदार तर यात सर्वात पुढे होता. मतांचा बाजार कामठीतून सुरू झाला हे राहुल गांधी यांनी सांगितले आहे. भाजपाची सत्ता असल्याने मतचोरांना शिक्षा होणार नाही पण मतदार मात्र या मतचोरांना शिक्षा देणार आहे. महाराष्ट्रातील या मतदारचोरांना धडा शिकवला पाहिजे, जिल्हा परिषद निवडणुकीत मतचोरी करणाऱ्यांना धडा शिकवून त्यांची औकात दाखवा, असे सांगितले.

विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यावेळी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे पण आपला हा अधिकार राहिला आहे का? अशी शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण टाकलेले मत त्याच पक्षाला जाते का, याबाबत मोठी शंका उपस्थित होत आहे. राहुल गांधी यांनी मतचोरीवर ७ ऑगस्टला पत्रकार परिषद घेतली, त्याची दखल जगभरात घेतली गेली. आज देशभर मतचोरीचा मुद्दा चर्चेत आहे, आता हा लढा जनतेपर्यंत घेऊन जावा लागणार आहे, त्यात सहभागी होऊन राहुल गांधींचे हात बळकट करा, असे आवाहन केले.

माजी मंत्री नसीन खान यावेळी म्हणाले की, लोकसभेत मविआने घवघवीत यश मिळवले पण पाच महिन्यातच चित्र बदलले, या पाच महिन्यात ४५ लाख मतदार घोळ करून वाढवले. मतदानाच्या चार दिवस अगोदरपर्यंत ऑनलाईन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली. काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे याची तक्रार केली पण हा आयोग भाजपाच्या इशारऱ्यावर काम करत आहे. राहुल गांधी यांनीही याविरोधात जोरदार लढा उभा केला आहे पण निवडणूक आयोग मात्र समाधानकारक उत्तर देत नाही. आज देशातील लोकशाही व संविधान धोक्यात आहे ते वाचवण्याचे काम आपल्याला करायचे आहे आणि आगामी निवडणुकीत मतांची चोरी होणार नाही यासाठी सजग रहा, असेही सांगितले.

काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री सुनिल केदार, यशोमती ठाकूर, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह प्रमुख नेत्यांनी मतचोरीच्या मुद्द्यावर भाजपा व निवडणूक आयोगावर तोफ डागत लोकशाही व संविधानावर होत असलेला हल्ला हाणून पाडला पाहिजे असे म्हटले.

About Editor

Check Also

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व एसटी बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये दर १५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *