मुंबईचे लचके तोडण्याचे मनसुबे दिल्लीतून पाहिले जात आहेत. त्यामुळे आता भांडत राहिलो तर मुंबईसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा अपमान ठरेल. यासाठी कर्तव्य म्हणून एकत्र आल्याचे सांगत शिवसेना उबाठा आणि मनसेने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बुधवारी युती झाल्याची घोषणा केली. दरम्यान, मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार असा निर्धार करीत ठाकरे बंधूंनी महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले.
वरळी येथील हॉटेल ब्ल्यू सीमध्ये शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, मनसेचे नेते अमित ठाकरे, रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, चंदू मामा यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक, महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक उपस्थित होते.
एका मुलाखतींद्वारे राज ठाकरे यांनी युतीचे संकेत दिले होते. त्यानंतर शालेय अभ्यासक्रमातील हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, तेव्हा एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी अशी घोषणा उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आली.
या घोषणेनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंच्या कौटुंबिक आणि राजकीय भेटी वारंवार होऊ लागल्या होत्या. मागील सहा महिन्यांपासून शिवसेना उबाठा – मनसे युतीची अधिकृत घोषणा कधी होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर दोन्ही ठाकरेबंधूंनी वरळी येथे पत्रकार परिषद घेऊन युतीची अधिकृत घोषणा केली. युतीची घोषणा होताच, शिवसैनिक मनसैनिकांनी ठाकरे बंधूंचा एकच जयघोष केला.
युतीची घोषणा करण्यापूर्वी दोन्ही कुटुंबियांची राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांची एकत्र भेट झाली. उद्धव आणि राज यांना यावेळी ओवाळण्यात आले. त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंनी कुटुंबासहित शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी जाऊन नतमस्तक झाले. तेथून ठाकरे बंधू पत्रकार परिषदेसाठी वरळी येथील ब्लू सी या हॉटेलवर दाखल झाले. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज यांच्याकडून मुंबई आणि मराठीच्या मुद्द्यावर यावेळी भर देण्यात आला. ठाकरे बंधूंनी यावेळी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठी माणसाच्या बलिदानामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली हे सांगताना संयुक्त महाराष्ट्र सत्यनारायणाची पूजा करून मिळालेला नाही. तीव्र संघर्ष केला. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांच्या योगदानाची आठवण करून देत महाराष्ट्राने मुंबई मिळाल्यावर मुंबईतच मराठी माणसाच्या उरावर उपरे नाचायला लागले आणि न्याय्य हक्कासाठी बाळासाहेब ठाकरेंना शिवसेनेची स्थापना करावी लागली. मधली वर्षे व्यवस्थित गेली. परंतु, आज पुन्हा एकदा मुंबईचे लचके तोडायचे मनसुबे दिल्लीतल्या दोघांचे असल्याचा आरोप करत केंद्र सरकारला लक्ष्य केले. आता आम्ही आपण भांडत राहिलो, तर मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाचा अपमान असेल. त्यामुळे आम्ही आमचे कर्तव्य म्हणून एकत्र आलो आहोत. यापुढे मुंबईवर आणि महाराष्ट्रावर कुणी ही वाकड्या नजरेने किंवा कपटी कारस्थानांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करेल, त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो असल्याचा इशारा सत्ताधाऱ्यांना दिला.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्व मराठी जनांना सांगतो, आता जर चुकाल, तर संपाल. आता फुटाल, तर पूर्णपणे संपून जाल. त्यामुळे तुटू नका, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका, असे आवाहन केले.
UddhavSaheb Thackeray #LIVE | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्यांची संयुक्त पत्रकार परिषद | हॉटेल ब्लू सी, वरळी, मुंबई https://t.co/HWtbiMJf3Z
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 24, 2025
दरम्यान, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, मीरा भाईंदर यासह अन्य महापालिकांत युती होणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी आजच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी मुंबई आणि नाशिकची युती ठरली असून अन्य महापालिकांबाबत नंतर सांगण्यात येईल असे स्पष्ट केले.
तर राज ठाकरे यांनी तूर्त मुंबई महापालिकेची युती जाहीर केली. तसेच जशा अन्य महापालिकांचे ठरेल तसे सांगितले जाईल, असेही यावेळी स्पष्ट केले.
दोन व्यक्ती राजकीय पक्षातील मुले पळवताहेत – राज ठाकरे
राज ठाकरे यांनी, एका मुलाखतीदरम्यान कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे म्हणालो होतो. तिथून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली, असे सांगत पत्रकार परिषदेत अधिक बोलणे टाळले. मला जे बोलायचे आहे ते जाहीर सभांमधून बोलेन हे सांगताना त्यांनी युतीची चर्चा ज्या मुलाखतीपासून सुरू झाली, त्याची आठवण करून देताना कोण किती जागा लढवणार? आकडा काय? हे आम्ही तुम्हाला सांगणार नाही असे सांगत जागा वाटपावर बोलणे टाळले.
राज ठाकरे पुढे बोलताना सत्ताधारी भाजपावर टीका करताना म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या लहान मुले पळवणाऱ्या टोळ्या फिरतायत, त्यात दोन व्यक्ती समाविष्ट झाल्या आहेत. ते राजकीय पक्षांमधली मुले पळवतात, असा उपरोधिक टोला लगावतानाच भाजपा आणि शिवसेना यांच्यावर निशाणा साधला. जे निवडणुका लढवणार आहेत, त्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाईल. अर्ज कधी भरायचे वगैरे माहिती नंतर दिली जाईल. बरेच दिवस ज्याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता, ती शिवसेना उबाठा व मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करत आहोत, अशी घोषणाही उद्धव ठाकरे यांच्या साक्षीने राज ठाकरे यांनी केली. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार, असा निर्धारही यावेळी जाहिर केला.
यावेळी रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंची ही शेवटची निवडणूक असेल, असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा समाचार राज ठाकरे यांनी घेत, त्यांना त्यांच्या पक्षात कोणी विचारत नाही. मुळात उत्तरे ही देवांना द्यायची असतात, दानवांना नाही, असा खोचक टोलाही लगावला.
मनसे-शिवसेना उबाठा युतीला मत म्हणजे मुस्लिमधार्जिण्या राजकारणाला मत अशी टीका भाजपाकडून करण्यात येत असल्याबाबत विचारले असता राज ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ फिरतोय, ज्यात ते अल्लाह हाफिज बोलताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी हिंदुत्वावरून काही बोलू नये, असा टोला लगावत पुढे म्हणाले की, माझ्याकडे मुख्यमंत्र्यांचे खूप ध्वनिचित्रफिती आहेत. त्यामुळे ते आता काय काय बोलतात, त्यानुसार माझे व्हिडिओ तयार असतील, असा सूचक इशाराही यावेळी दिला.
शिवसेना-मनसे युतीची घोषणा दोन्ही ठाकरे बंधूंकडूनच केली जाणार होती. यासाठी व्यासपीठावर दोघांसाठी आसन व्यवस्था केली होती. मात्र या युतीसाठी संजय राऊत यांनी विशेष प्रयत्न केले. म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांना आपल्या शेजारी बसण्यासाठी आसन दिले. संजय राऊत यांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्रात आला तो मराठी ऐक्याचा मंगल कलश होता. आजही मराठी ऐक्याचा मंगल कलश घेऊन राज आणि उद्धव आले आहेत. तोच आनंदाचा क्षण घेऊन आले आहेत. हाच मंगल कलश मुंबईसह अनेक महापालिकेत विजयी भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही अशी आशाही यावेळी केली.
Marathi e-Batmya