काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी (३ फेब्रुवारी २०२६) भारत-अमेरिका व्यापार करारावरून सरकारवर जोरदार टीका केली, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तडजोडीच्या स्थितीत आले असल्याचा दावा केला.
विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे लोकसभा अनेकदा तहकूब झाल्यानंतर संसद परिसरात पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी आरोप केला की, पंतप्रधानांनी या कराराद्वारे भारतीय शेतकऱ्यांच्या मेहनतीचा सौदा केला आहे.
राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, “जो व्यापार करार चार महिन्यांपासून रखडला होता. त्यात काहीही बदल झालेला नाही, पण ज्या कारणास्तव मोदी आणि मला दोघांनाही माहिती आहे, त्या कारणास्तव त्यांनी काल संध्याकाळी या करारावर स्वाक्षरी केली,” असे सांगत, “नरेंद्र मोदीजींवर प्रचंड दबाव आहे.” हजारो कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या त्यांच्या प्रतिमेचा ‘फुगा’ फुटू शकतो, असा इशाराही यावेळी दिला.
लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरोप केला की, पंतप्रधान त्यांना ‘नरावणे, एपस्टाईन फाइल्स आणि त्यांनी शुल्काच्या (टॅरिफ) बाबतीत कसे शरणागती पत्करली’ याबद्दल बोलू देण्यास ‘खूप घाबरत’ आहेत. इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावादरम्यान विरोधी पक्षनेत्यांना बोलण्याची परवानगी दिली गेली नाही.
PM Modi is Compromised.
PM is too afraid to let me speak in Parliament about Naravane, Epstein Files and how he has surrendered on Tariffs. pic.twitter.com/V1J6yxZDM2
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 3, 2026
लोकसभेत मोठा राजकीय वाद निर्माण झाल्यानंतर एक दिवसाने, राहुल गांधी यांनी मंगळवारी (३ फेब्रुवारी २०२६) लोकसभेत एका लेखाची प्रत सादर केली, ज्यात २०२० च्या भारत-चीन संघर्षावर माजी लष्करप्रमुख एम.एम. नरावणे यांच्या अप्रकाशित ‘आत्मचरित्रा’चा उल्लेख होता.
नरेंद्र मोदी घाबरले असल्याचा दावा करत, राहुल गांधी यांनी दोन ‘दबावाचे मुद्दे’ अधोरेखित केले — एपस्टाईन फाइल्स आणि अमेरिकेत गौतम अदानी यांच्या विरोधात सुरू असलेला खटला.
पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “मुख्य गोष्ट अशी आहे की, आपले पंतप्रधान तडजोडीच्या स्थितीत आले आहेत. हे कोणी केले आणि का केले, याचा विचार भारताच्या जनतेला करावा लागेल…. भारताच्या शेतकऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, या व्यापार करारामध्ये नरेंद्र मोदींनी तुमच्या श्रमाचा आणि घामाचा सौदा केला आहे. आणि याचे कारण ते आता तडजोडीच्या स्थितीत आहेत. केवळ तुमचाच (शेतकऱ्यांचा) नाही, तर संपूर्ण देशाचा सौदा झाला आहे. म्हणूनच मला तिथे (सभागृहात) बोलू दिले जात नाही,” असा आरोप करत “नरेंद्र मोदी घाबरले आहेत, कारण ज्या लोकांनी त्यांची प्रतिमा घडवली, तेच आता ती उध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीकाही केली.
कोणत्या प्रकारच्या दबावाबद्दल विचारले असता, राहुल गांधी म्हणाले: “(गौतम) अदानी यांच्या विरोधात अमेरिकेत एक खटला सुरू आहे. ते अदानींना नव्हे, तर नरेंद्र मोदीजींच्या आर्थिक रचनेला लक्ष्य करत आहेत. हा एक मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा एपस्टीन फाइल्सचा आहे. एपस्टीन फाइल्समध्ये अशी आणखी माहिती आहे, जी संपूर्ण देशाला जाणून घ्यायची आहे, पण अमेरिकेने ती प्रसिद्ध केलेली नाही,” असेही सांगितले.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, “आणि दुसरा मुद्दा म्हणजे, अदानींवरील खटला हा खरं तर मोदींवरच आहे, कारण ती भाजपाची आर्थिक रचना आहे, मोदीजींची आर्थिक रचना आहे. हे दोन दबावाचे मुद्दे आहेत,” असेही सांगितले.
दरम्यान, घोषणाबाजी केल्याबद्दल आणि सभागृहाच्या मध्यभागी फाडलेल्या कागदाचे तुकडे फेकल्याबद्दल आठ काँग्रेस खासदारांना सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी लोकसभेतून निलंबित करण्यात आले.
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सादर केलेल्या यादीत अमरिंदर सिंग राजा वारिंग, गुरदीप सिंग औजला, हिबी इडन, डीन कुरियाकोस, प्रशांत पाडोळे, किरण कुमार रेड्डी, एस. वेंकटरामन आणि माणिकम टागोर यांचा समावेश होता.
Marathi e-Batmya