रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती, रेल्वेची आर्थिक परिस्थिती सुधारली संसदेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली माहिती

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी (६ फेब्रुवारी, २०२६) सांगितले की, गेल्या १० वर्षांत रेल्वे विभागाची आर्थिक स्थिती खूप सुधारली आहे आणि सर्व खर्च भागवल्यानंतर आता विभागाकडे थोडा महसूल शिल्लक आहे.

राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, २०१४-२४ या काळात ५.०४ लाख नोकऱ्या निर्माण झाल्या, तर सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात आणखी १.५ लाख रोजगार उपलब्ध करून दिले जात आहेत.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, गेल्या १० वर्षांत मालवाहतूक वाढवण्यासाठी, प्रवासी महसूल वाढवण्यासाठी, तसेच खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्यात आले आहेत. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १० वर्षांत भारतीय रेल्वेच्या आर्थिक स्थितीत खूप सुधारणा झाली आहे,” असे ते भाजपाचे ज्येष्ठ सदस्य लक्ष्मीकांत वाजपेयी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

यावर अधिक स्पष्टीकरण देताना अश्विनी वैष्णव म्हणाले की, सुमारे १२ लाख कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे कर्मचाऱ्यांचा खर्च सुमारे १.१८ लाख कोटी रुपये आहे, तर १८ लाख निवृत्तीवेतनधारकांवर ६५,००० कोटी रुपये खर्च येतो. ऊर्जेचा खर्च ३२,००० कोटी रुपये, वित्तीय खर्च २३,००० कोटी रुपये आणि देखभालीचा खर्च ८,००० कोटी रुपये आहे. रेल्वेचा एकूण खर्च सुमारे २.७४ लाख कोटी रुपये आहे, असेही त्यांनी सांगितले.

अश्विनी वैष्णव पुढे बोलताना म्हणाले की, “केंद्र सरकारने गेल्या १० वर्षांत उचललेल्या पावलांमुळे रेल्वे सर्व खर्च भागवल्यानंतरही थोडा नफा कमवत आहे,” असे सांगितले.

२०२४-२५ या आर्थिक वर्षात, परिचालन गुणोत्तर ९८.२२% होते, एकूण वाहतूक महसूल २,६५,११४ कोटी रुपये आणि नफा २,६६० कोटी रुपये होता, अशी माहिती मंत्र्यांनी लेखी उत्तरात दिली.

अश्विनी वैष्णव म्हणाले की, रेल्वे नेटवर्कचे संपूर्ण विद्युतीकरण करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयामुळे ऊर्जेच्या खर्चात कपात झाली आहे, तसेच प्रचंड पर्यावरणीय फायदेही मिळाले आहेत. मालवाहतुकीत वाढ होऊनही, ऊर्जेचा (डिझेल आणि विजेचा) खर्च चार वर्षांपूर्वीच्या ₹३७,८४१ कोटींवरून सुमारे ₹३२,४०० कोटींपर्यंत कमी झाला आहे, असे अधोरेखित केले.

मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, कामकाजातील कार्यक्षमतेमुळे, विशेषतः ऊर्जा खर्चात ₹५,५०० कोटींची बचत, उत्तम देखभाल पद्धती आणि मालवाहतुकीत ४०० दशलक्ष टनांची वाढ यामुळे रेल्वेला थोडा महसूल अधिशेष मिळत आहे.

अश्विनी वैष्णव म्हणाले की, सरकार सर्व प्रवाशांना ₹६०,००० कोटींचे अनुदान देत आहे. प्रवाशांच्या रेल्वे भाड्यात अनुदानाची पातळी ४५% आहे.

रोजगार निर्मितीबद्दल बोलताना मंत्री म्हणाले की, २०१४ ते २०२४ दरम्यान सुमारे ५.०४ लाख कोटी नोकऱ्या देण्यात आल्या.
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात, १.५ लाख लोकांना नोकऱ्या देण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि या दिशेने चांगली प्रगती होत आहे, असे वैष्णव म्हणाले.

अश्विनी वैष्णव म्हणाले की, सहाय्यक लोको पायलटच्या १८,००० रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि त्यांच्या रुजू होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परीक्षा केंद्रांवरील कोणत्याही तक्रारींवर कारवाई सुनिश्चित करण्यासाठी रेल्वेने एक ‘वॉर रूम’ तयार केली आहे, असे सांगितले.

दुसऱ्या पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना अश्विनी वैष्णव म्हणाले की, मोदी सरकारने ईशान्येकडील राज्यांवर खूप लक्ष दिले आहे. युपीए सरकारच्या काळात केवळ ₹२,००० कोटी असलेले बजेट वाढवून ₹११,४८६ कोटी करण्यात आले आहे, असेही सांगितले.

About Editor

Check Also

Indian Coast Guard

Indian Coast Guard : भारतीय तटरक्षक दलाची मुंबईजवळील समुद्रात मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय तेल तस्करीचा सागरी टोळीचा पर्दाफाश केला.

भारतीय तटरक्षक दलाने Indian Coast Guard एका धाडसी सागरी कारवाईत आंतरराष्ट्रीय तेल तस्करी सिंडिकेटचा पर्दाफाश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *