आमदार विलास तरे यांची माहिती, २ वर्षात २०० एस. टी. बसेस पालघर वासियांना मिळणार परिवहन मंत्री तथा सहपालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबतच्या बैठकीत निर्णय

पालघर जिल्ह्यातील राज्य परिवहन सेवेतील मनुष्यबळ व बसेस कमतरता दूर करण्याच्या दृष्टीने परिवहन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे सहपालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीत पालघर जिल्ह्यासाठी पुढील २ वर्षांत एकूण २००  नवीन एस.टी. बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांनी दिली.

दरम्यान आमदार विलास तरे यांनी सांगितले की, पालघर जिल्ह्यातील विविध एस.टी. आगारांमध्ये मनुष्यबळ व बसेस मोठ्या प्रमाणात कमतरता असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर १० फेब्रुवारी २०२६  रोजी त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन देऊन या विषयावर तातडीची बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने ०५ मार्च २०२६ रोजी विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीत पालघर जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी टप्प्याटप्प्याने २०० नवीन बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयानुसार सन २०२६-२७  या आर्थिक वर्षात ९० बसेस आणि सन २०२७-२८ या आर्थिक वर्षात ११०  बसेस देण्यात येणार आहेत. तसेच या बसेस जिल्ह्यातील विविध आगारांमध्ये आवश्यकतेनुसार वितरित करण्यात येणार असून त्यामध्ये पालघर आगारासाठी १०, सफाळे १०, वसई १५, अर्नाळा १५, डहाणू ०५, जव्हार १५, बोईसर १०  आणि नालासोपारा १० बसेस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय विभागीय कार्यशाळा व संबंधित आगारांमधील रिक्त पदे येत्या ०३ महिन्यांच्या आत पूर्ण क्षमतेने भरण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.
यावेळी आमदार विलास तरे यांनी २१ फेब्रुवारी २०२६ रोजी विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या “परीक्षेसाठी पिकअप वाहनातून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास” या बातम्यांकडे मंत्री सरनाईक यांचे लक्ष वेधले. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मानव विकास मिशन अंतर्गत ‘गाव ते शाळा’ ही मोफत बस सेवा सुरू करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विद्यार्थ्यांसाठी ‘गाव ते शाळा’ मोफत बस सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

या निर्णयांमुळे पालघर जिल्ह्यातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुलभ व नियमित सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असून ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होतील, असा विश्वास आमदार विलास तरे यांनी व्यक्त केला. तसेच विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध झाल्यास त्यांच्या शिक्षणाला मोठा हातभार लागेल, असेही आ. तरे यांनी नमूद केले.

About Editor

Check Also

वरळीतील टेस्टिंग लॅबच्या भूखंडावर बहुमजली रोबोटिक पार्किंग प्रकल्प आणि इमारतीच्या टेंडरची चौकशी सपा आमदार रईस शेख याच्या प्रश्नाला माधुरी मिसाळ यांचे उत्तर तर नार्वेकर यांचे बैठकीचे आश्वासन

बृहन्मुंबई महानगरपालिकेने वरळीतील महापालिकेच्या टेस्टिंग लॅबच्या जागेवर बहुमजली रोबोटिक पार्किंगसाठी काढलेल्या टेंडरबाबत तसेच ई वार्ड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *