सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने भारताचे सरन्यायाधीश (सीजेआय) भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सीजेआय यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ वकिलांच्या खटल्यांची सुनावणी करत असताना हे नाट्य उलगडले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वकिलाने व्यासपीठाजवळ जाऊन आपला बूट काढून न्यायाधीशांवर फेकण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक घटना घडल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने बार आणि बेंच संकेतस्थळाने दिले.
तथापि, सर्वोच्च न्यायालयात उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि वकिलाला बाहेर काढले. बाहेर पडताना वकिलाने असे म्हणताना ऐकले की, “सनातन का अपमान नहीं सहेंगे.”
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई निश्चिंत राहिले आणि त्यांनी न्यायालयात उपस्थित असलेल्या वकिलांना त्यांचे युक्तिवाद सुरू ठेवण्यास सांगितले. तसेच “या सर्व गोष्टींमुळे विचलित होऊ नका. आम्ही विचलित नाही. या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही,” असे सांगितले.
खजुराहो येथे भगवान विष्णूच्या ७ फूट शिरच्छेदित मूर्तीच्या जीर्णोद्धाराशी संबंधित मागील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या टिप्पण्यांमुळे ही घटना घडली असावी. तो खटला फेटाळताना ते म्हणाले होते, “जा आणि देवतेलाच आता काहीतरी करायला सांगा. तुम्ही म्हणता की तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर भक्त आहात. म्हणून आता जा आणि प्रार्थना करा. ते एक पुरातत्वीय स्थळ आहे आणि एएसआय ला परवानगी देणे आवश्यक आहे असे मतही सांगितले.
या निरीक्षणामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती, अनेकांनी सरन्यायाधीश भूषण गवई वर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला होता. दोन दिवसांनंतर खुल्या न्यायालयात झालेल्या वादाला संबोधित करताना मुख्य सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की त्यांचा अनादर करण्याचा हेतू नव्हता. मी सर्व धर्मांचा आदर करतो…हे सोशल मीडियावर घडले, असेही यावेळी सांगितले.
केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मुख्य सरन्यायाधीश यांचे समर्थन करत म्हटले होते की, घटनांवरील प्रतिक्रिया अनेकदा सोशल मीडियावर प्रमाणाबाहेर वाढतात.
“आम्ही हे पाहिले आहे… न्यूटनचा नियम आहे जो म्हणतो की प्रत्येक कृतीला समान प्रतिक्रिया असते, परंतु आता प्रत्येक कृतीला सोशल मीडियावर विषम प्रतिक्रिया असते.
Marathi e-Batmya