एल्गार परिषद आणि भीमा गोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी सागर गोरखेला विधी शाखेच्या पदवी परीक्षेला बसण्यासाठी विशेष एनआयए न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. सागर गोरखे यांना १४ डिसेंबर ते ४ जानेवारी कालावधीसाठी विधी शाखेच्या पदवीच्या (एलएलबी) पहिल्या सत्राच्या परीक्षेला बसण्याची परवानगी देताना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
सागर गोरखेला २२ दिवसांसाठी तसेच ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक मुचलक्यावर विशेष न्यायाधीश चकोर भावीस्कर यांनी अंतरिम जामीन मंजूर केला. तसेच जर आरोपी जामिनाची व्यवस्था करू शकत नसेल, तर त्याला २५ हजार रुपयांचा रोख जामीन देण्याची परवानगी असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. याचिकेनुसार, सागर गोरखे यांनी प्रवेशपूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील विद्यापीठाच्या अखत्यारीतील महाविद्यालयात तीन वर्षांचा एलएलबीसाठी प्रवेश घेतला होता. तुरुंगातील गर्दी आणि तणावपूर्ण स्थितीचा पाहता कोणत्याही तणावमुक्त परीक्षेची तयारी करता यावी, यासाठीही तात्पुरता दिलासा देण्याची मागणी केली होती. आपल्या बॅरेकमध्ये कैद्यांची मंजूर संख्या १८ असली तरी तेथे ४० पेक्षा जास्त कैदी आहेत. बॅरेकतील कैद्याची संख्या कारागृहात अशांतेत परीक्षेची तयारी करण्यासाठी अनुकूल ठिकाण नसल्याचेही याचिकेत म्हटले होते.
सागर गोरखे यांची मागणी मान्य करून न्यायालयाने त्यांना ताप्तुरता जामीन मंजूर केला तसेच एक मोबाइल फोन नंबर तुरुंग अधिकारी, एनआयए देण्याचे आदेश दिले. तसेच तो सदैव चालू ठेवावा, जेणेकरून आवश्यक असल्यास, त्याच्याशी संपर्क साधता आणि त्याचा ठावठिकाणा शोधता येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. दुसरीकडे, न्यायालयाने आणखी एक आरोपी महेश राऊतलाही व्हिवा-व्हॉइस, सेमिस्टर-१, एलएलबी प्रथम वर्षाच्या प्रवेश परीक्षेला बसण्याची परवानगी दिली. ३१ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव हिंसचारानंतर सागर गोरखे आणि महेश राऊत यांना अटक केली होती.
Marathi e-Batmya