गेल्यावर्षी जुलै महिन्यात वरळी येथील बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणातील मृत पीडितेच्या पतीने उच्च न्यायालयात धाव घेऊन प्रकऱणातील मुख्य आरोपी महिरी शहाविरोधात खुनाच्या खटला चालविण्याची मागणी केली आहे. याचिकेची गंबीर दखल घेऊन न्यायालयाने मुंबई पोलिसांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
उच्च न्यायालयाच्या न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने मुंबई पोलिसांच्या वरळी पोलीस ठाण्याला नोटीस बजावली असून भूमिका स्पष्ट कऱण्याचे आदेश देऊन सुनावणी २१ जानेवारी रोजी ठेवली.
गेल्यावर्षी ७ जुलै २०२४ रोजी, आरोपी मिहिर शाहने त्याच्या बीएमडब्ल्यू गाडीने प्रदीप नखवा (५०) आणि त्याची पत्नी कावेरी नखवा (४५) या दुचाकीला धडक दिली होती. कावेरी गाडीच्या बंपर आणि टायरमध्ये अडकल्यानंतर सुमारे २ किमी फरफटत गेल्यामुळे त्यांच्या मृत्यू झाला.
तथापि, नखावा यांनी ७ जानेवारी रोजी दाखल केलेल्या आपल्या याचिकेत मुंबई पोलिसांना भारतीय न्याय संहिताच्या कलम १०३ (खूनाची शिक्षा) अंतर्गत आरोप दाखल करण्याचे आणि आरोपींविरुद्ध खुनाचे आरोप जोडून अतिरिक्त आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. ऑक्टोबर २०२४ पासून प्रतिवादी पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत वारंवार पत्रे पाठवूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे नखावा यांनी याचिकेत म्हटले आहे.
याचिकेत पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कावेरी नखवा वाहनाखाली अडकलेली असतानाही आरोपीने तिला ओढून नेणे हे जाणूनबुजून आणि अमानवीय वर्तन दर्शवते. जे या कलम १०३ चा समावेश करण्यास समर्थनीय आहे. शवविच्छेदन अहवालात कावेरीच्या मृत्यूचे कारण क्रूरपणे ओढून नेणे आणि जोरात टक्कर झाल्यामुळे झालेल्या अनेक गंभीर ओरखड्यांमुळे होणारा रक्तस्त्राव असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
वेगाने गाडी चालवणे, गाडीवरील नियंत्रण सुटणे, गाडी आदळल्यानंतरही गाडी थांबविण्यात अयशस्वी होणे आणि पीडितेला ओढून नेणे हे अत्यंत निष्काळजीपणाचे आणि सार्वजनिक सुरक्षेकडे दुर्लक्ष आहे. चालकाने जखमी महिलेला मदत करण्यास अयशस्वी होणे हे कायदेशीर आणि नैतिक कर्तव्यांचे उल्लंघन असल्याचेही याचिकेत म्हटले आहे. अनेक पुरावे असूनही, आरोपींनी केलेल्या क्रूर कृत्यांसाठी त्यांच्यावर लागू होणारे खुनाचे कलम लावण्यात तपास अधिकारी अयशस्वी ठरले आहेत. हे तपासात निष्काळजीपणा किंवा पक्षपातीपणा दर्शवितात. त्यामुळे पोलिसांना त्यांचे कर्तव्य पार पाडण्याचे आदेश देण्यासाठी न्यायालयीन हस्तक्षेपाची आवश्यकता असल्याचाही दावाही याचिकेत केला आहे.
मिहिर शहा वरळी येथे वेगाने गाडी चालवत असताना गाडीवरूल नियंत्रण सुटल्याने गाडी नखावा दाम्पत्यांच्या स्कुटरवर आदळली होती. अपघातानंतर ड्रायव्हरसोबत सीट बदलल्याचा आरोप मिहीरवर आहे. २४ वर्षीय शाह माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राजेश शाह यांचा पुत्र आहे. याप्रकऱणी मुलाची माहिती लपवल्याबद्दल राजेश यांना आधी अटक त्यानंतर जामीन मंजूर झाला होता. तर मिहिर आणि त्यांचा ड्रायव्हर राजऋषी बिंदावत या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. नोव्हेंबर २०२४ मध्ये, उच्च न्यायालयाने मिहिर आणि राजऋषी यांची अटक बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करून याचिका फेटाळल्या होत्या.
Marathi e-Batmya