आमदार महेश सावंत यांना उच्च न्यायालयाचे समन्स सदानंद सरवणकर यांच्या निवडणूक याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

माहिम विधानसभा मतदारसंघातील उबाठा गटाचे नवनिर्वाचित आमदार महेश सांवत यांच्या आमदाराकीला शिंदे गटाचे सदानंद सरवणकर यांनी निवडणूक याचिकेतून आव्हान दिले आहे. त्या याचिकेची दखल घेऊन उच्च न्यायालयाने महेश सावंत यांना शुक्रवारी समन्स बजावले आहे. तसेच भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही दिले.

उच्च न्यायालयाच्या न्या. आरिफ डॉक्टर यांच्या एकलपीठासमोर सदा सरवणकर यांच्या निवडणूक याचिकेवर शुक्रवारी प्राथमिक सुनावणी झाली. त्याची दखल घेऊन न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले. तसेच याचिकेवर तीन आठवड्यांनी सुनावणी निश्चित केली.

काय प्रकरण

नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच, सरवणकर यांनी ही निवडणूक याचिका दाखल केली होती. महेश सावंत यांनी त्यांच्याविरुद्ध प्रलंबित असलेले सर्व फौजदारी खटले लपवून ठेवले आणि मतदारांची दिशाभूल केल्याचा आरोप याचिकेतून सदा सरवणकर यांनी केला आहे. तसेच ही माहिती न देणे हे महेश सावंत यांना अपात्र ठरवण्यासाठी आणि २०२४ च्या माहिम विधानसभा निवडणुकीचे निकाल रद्द करण्यासाठी पुरेसे कारण असल्याचेही सदा सरवणकर यांनी याचिकेत म्हटले आहे.

माहिम निवडणूक प्रतिष्ठेची

विधानसभा निवडणुकीदरम्यान माहीम मतदारसंघातील निवडणूक शिंदे गट, उबाठा गट आणि मनसेसाठी प्रतिष्ठेची ठरली होती. शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदानंद ऊर्फ सदा सरवणकर, उबाठा गटाचे महेश सावंत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपूत्र अमित यांच्यात या मतदारसंघातून तिहेरी लढत रंगली होती. त्यावेळी महायुतीतील अंतर्गत संघर्षही दिसून आला होता. भाजपा नेत्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उघडपणे सरवणकर यांना माघार घेण्यास सांगितले होते. नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी, सरवणकर यांनी अमित यांची भेट घेण्यासाठी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते. परंतु, राज ठाकरे कुटुंबियांनी त्यांना भेटण्यास नकार दिल्याचे म्हटले गेले होते, त्यानंतर सदा सरवणकर यांनीही माघार घेण्यास नकार दिला. तथापि, सावंत यांनी माहीम मतदारसंघातून ५०,२१३ मतांनी विजय मिळवला, तर सरवणकर ४८,८९७ मतांनी दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तर अमित ठाकरे यांना ३३,०६२ मते मिळाली होती.

About Editor

Check Also

सोनम वांगचुक यांच्या स्थानबध्दतेचे केंद्राकडून सर्वोच्च न्यायालयात समर्थन वांगचूक यांच्याकडूनच फुटीरता वादी चिथावणीखोर भाषणे

केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रतिबंधात्मक अटकेचे समर्थन केले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *