व्यंगात्मक गीत गायल्यामुळे विनोदवीर कुणाल कामराला अडचणीत सापडला असताना दुसरीकडे अशा विनोदी कलाकारांना संरक्षण देण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. कुणाल कामरासारख्या उपहासात्मक आणि मिश्किलपणे राजकीय टीका-टिपण्णी करणाऱ्या विनोदी कलाकारांवर मनमानी, अहेतूक पद्धतीने दाखल होणारे गुन्हे रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखण्याचे आदेश देण्याची मागणी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेतून करण्यात आली आहे.
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विधी शाखेच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याने मुंबई उच्च न्यायालयात ही जनहित याचिका केली आहे. कुणाल कामराने केलेली टिपण्णी अथवा भाषण भारतीय संविधानाच्या कलम १९ अंतर्गत,अभिव्यक्ती स्वातंत्र संरक्षित असल्याचे जाहीर कऱण्याची मागणी याचिकेत केली आहे. कुणाल कामराचे वक्तव्य उपहासात्मक आणि मिश्किल राजकीय टीका या दोन्हींच्या कक्षेत येते, जे घटनात्मक अभिव्यक्ती स्वातंत्र्याद्वारे संरक्षित असल्याचा दावा याचिकाकर्तांनी केला आहे. लोकशाहीमध्ये राजकीय विनोद आणि उपहासात्मक टिका यांची मूलभूत भूमिका अधोरेखित करते. अशा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध घालणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचा दावा याचिकेत केला आहे.
विनोदवीराकडून केलेली राजकीय टीका दुसरीकडे हिंसाचाराला खऱ्या अर्थाने प्रवृत्त देणारी भाषणे यांच्यात फरक अधोरेखीत करण्यासाठी कायदेशीर चौकट आखणे आवश्यक आहे. ज्यामुळे देशातील लोकशाहीचे स्वातंत्र्य अबाधित राहील. त्यासाठी विनोदी कलाकारांच्या वक्तव्यावर मनमानी पदधतीने दाखल होणारे गुन्हे रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखण्याची मागणी याचिकेत केली आहे. तोपर्यंत त्यांचे भाषण हिंसाचाराला उत्तेजन देत नाही. कुणाल कामराचा व्हिडिओ लाईक, शेअर किंवा ट्विट करणाऱ्या व्यक्तींनाही संरक्षण द्यावे, तसेच कामराचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर शिवसेना (शिंदे गटाच्या) कार्यकर्त्यांनी केलेल्या कृतींची कायदेशीर आणि घटनात्मक वैधता तपासण्याची मागणीही याचिकेत केली आहे.
कुणाल कामराचे वक्तव्य उपहासात्मक आणि मिश्किल राजकीय टीका म्हणण्यास पात्र आहे का?, आणि कलम १९(१)(अ) अंतर्गत संरक्षित आहे का? किंवा ते भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम ३५३ अंतर्गत गुन्हा का? राजकीय टीका-टिपण्णीवर फौजदारी कायदा लागू होऊ शकतो का?, कामराचा शो ज्या ठिकाणी पार पडला तो स्टुडिओ त्यावर पाडकामाची कारवाई करण्यात आली. परंतु, अन्यत्र अनधिकृत बांधकामे तशीच आहेत. हे घटनेच्या कलम १४ (समानतेचा अधिकार) चे उल्लंघन नाही का? कुणाल कामराच्या व्हिडिओनंतर त्याला लक्ष्य करताना कथित द्वेषपूर्ण भाषण करणारे भाजपा आमदार नितेश राणे आणि उजव्या विचारसरणीचे नेते संभाजी भिडे यांच्यावर कारवाई का झाली नाही? हा अधिकाराचा गैरवापर नाही का?, असे प्रश्न याचिकेत उपस्थित करण्यात आले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
कुणाल कामराने फेब्रुवारीमध्ये खार येथील हॉटेल युनिकाँटीनेंटलमध्ये हॅबिटॅट स्टुडिओमध्ये सादर केलेल्या ‘नया भारत’ या स्टँडअप कॉमेडी शो केला होता. त्याचा व्हिडीओ गेल्या शनिवारी यूट्यूबवर अपलोड करण्यात आला. त्यामधील कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल व्यंगात्मक गीत गायल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांना शो रेकॉर्ड कऱणाऱ्या स्टुडिओची तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांनी शिवसेना कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आणि १२ जणांना याप्रकरणी अटक करून नंतर जामिनावर सोडण्यात आले. कुणाल कामराविरोधात खारसह राज्यातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून नुकताच कामराला मद्रास उच्च न्यायालयाने सात एप्रिलपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
Marathi e-Batmya