बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कथित चकमकीप्रकरणातील तपास हलक्या पद्धतीने घेतल्याबद्दल उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला (सीआयडी) चांगलेच फैलावर घेतले. तसेच तपासातील त्रुचीमुळे तपास यंत्रणेवर संशय निर्माण होत असून चुकीचा निष्कर्ष काढला जात असल्याचे न्यायालयाने खडेबोल सुनावले.
या प्रकरणातील तपासामागील राज्य सीआयडीचे वर्तन संशय निर्माण करणारे असून या वर्तनामुळे तपास यंत्रणा दंडाधिकाऱ्यांना सर्व माहिती देऊ इच्छित नाही, असा चुकीचा निष्कर्ष काढला जाऊ शकतो, असेही न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने तपास यंत्रणेला सुनावले. तसेच या प्रकरणाचा तपास निष्पक्ष पद्धतीने करण्यावर भर देण्याचा सल्लाही राज्य सीआयडीला दिला. स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमता लक्षात घेऊनच हे प्रकरण राज्य सीआयडीकडे वर्ग केले होते. या मृत्यूची चौकशी करणाऱ्या न्यायदंडाधिकाऱ्यांकडे चौकशी आणि कागदपत्रे सादर करण्यात आलेल्या काही त्रुटी लक्षात आल्यानंतर न्यायालयाने उपरोक्त संताप व्यक्त केला.
राज्य सीआयडी हे गंभीर प्रकरण इतक्या हलक्यात कसे घेऊ शकते?, हा मुद्दा कोठडीतील मृत्यूशी संबंधित आहे. तुम्ही अशा वागणुकीमुळे स्वतःवरच संशय आणि शंका निर्माण करीत आहात. तुम्ही कोणती चौकशी करत आहात? या प्रकरणाशी संबंधित वैद्यकीय कागदपत्रे का जमा केली नाहीत, असा प्रश्नही खंडपीठाने उपस्थित केला. राज्य सीआयडी माहिती योग्यरित्या का गोळा करत नाही? आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका. वैद्यकीय कागदपत्रे गोळा केली जात नाहीत. तुम्ही दंडाधिकाऱ्यांकडून माहिती रोखण्याचा प्रयत्न करत आहात का? हाच निष्कर्ष आम्ही काढत आहोत. असेही न्यायालयाने तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना स्पष्ट केले. योग्य चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी सर्व कागदपत्रे गोळा करून दंडाधिकाऱ्यांकडे सादर केली जातील याची खात्री करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले. या प्रकरणाची चौकशी करा तरच दंडाधिकारी योग्य अहवाल तयार करू शकतील, असे खंडपीठाने म्हटले आहे. प्रत्येक तपास निष्पक्षतेने होणे गरजेचे आहे. मग ते आरोपी आणि त्यांच्या कुटुंब का ना असोत, असेही न्यायालयाने तपास यंत्रणेला सुनावले आणि प्रकरणाची पुढील सुनावणी २० जानेवारी रोजी ठेवली.
बदलापूर येथील शाळेत अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी अक्षयला पोलीस सोमवारी सायंकाळी तळोजा कारागृहातून बदलापूर क्राईम ब्रान्चला घेऊन जात असताना अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत एपीआय निलेश मोरे यांना गोळी लागली. त्यानंतर एपीआय निलेश मोरे यांनी स्वसंरक्षणासाठी गोळी झाडली. यामध्ये अक्षयचा मृत्यू झाला. शिंदेच्या कथित चकमकीला त्यांच्या वडिलांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
Marathi e-Batmya