प्रकाश आबिटकर यांची माहिती, ‘सिकलसेलमुक्त महाराष्ट्र’ अभियानाला वेग; ५९.६२ लाखांची तपासणी पूर्ण उर्वरित तपासण्या १५ पर्यंत तपासणी पूर्ण

राज्यातील सिकलसेल या आनुवंशिक आजाराविरुद्ध सुरू असलेल्या अभियानाला वेग देण्यात आला असून आतापर्यंत ५९ लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित तपासणी १५ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत दिली.

विधान परिषदेत सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, सिकलसेलमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी शासनाने मिशन मोडमध्ये काम सुरू केले आहे. नागपूर अधिवेशनादरम्यान आदिवासी बहुल जिल्ह्यांतील आमदारांसोबत बैठक घेऊन स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करण्यात आली असून त्याअंतर्गत ‘अरुणोदय’ अभियान सुरू करण्यात आले आहे.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, १५ जानेवारी २०२६ पासून सुरू झालेल्या मोहिमेत ० ते ४० वयोगटातील ७३.८४ लाख व्यक्तींची तपासणी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ५९.६२ लाख व्यक्तींची तपासणी पूर्ण झाली असून त्यात १,७१४ सिकलसेल रुग्ण आणि २८,३९८ सिकलसेल वाहक आढळले आहेत. अभियानापूर्वी व नंतर एकत्रितपणे राज्यात २२,६८८ सिकलसेल रुग्ण आणि २,०८,९५२ वाहकांचे निदान झाले असल्याची माहिती यावेळी दिली.

प्रकाश आबिटकर पुढे बोलताना म्हणाले की, सिकलसेल रुग्णांना लाल कार्ड, वाहकांना पिवळे कार्ड आणि सामान्य व्यक्तींना पांढरे कार्ड देण्याची योजना राबविण्यात आली आहे. लाल कार्ड असलेल्या व्यक्तींनी लाल किंवा पिवळे कार्ड असलेल्या व्यक्तींशी विवाह करू नये, यासाठी जनजागृतीही करण्यात येत असल्याचे सांगितले.

राज्यातील २१ आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये सुमारे ७० लाख नागरिकांचे स्क्रीनिंग करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून त्यासाठी ब्लड बँक, ब्लड स्टोरेज युनिट, औषधे आणि मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तसेच सिकलसेल रुग्णांना संजय गांधी निराधार योजनेतून मदत तसेच महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गतही उपचारांचा लाभ देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

सदस्य प्रवीण दरेकर, मनीषा कायंदे, चित्रा वाघ आणि अमित गोरखे यांनी अभियान अधिक गतीने राबविणे, थॅलेसेमियासाठीही अशाच मोहिमेची गरज तसेच उपचार सुविधा वाढवण्याबाबत सूचना केल्या.

या सूचनांचा सकारात्मक विचार करून सिकलसेलविरोधातील मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येईल, असे आश्वासन मंत्री आबिटकर यांनी दिले.

About Editor

Check Also

नागरिकांनी कर्करोग तपासणीसाठी पुढे यावे, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन कर्करोगाबाबत जागृती, तपासणी आणि उपचार अशा तीन स्तरावर मोहीम

राज्यात सर्व प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. कर्करोगाच्या तातडीने निदानासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणी करण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *