राज्यातील अमली पदार्थांची विक्री, तस्करी आणि सेवन रोखण्यासाठी राज्य शासनाकडून व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. अमली पदार्थ व्यापार व सेवनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कार्यवाहीसाठी स्वतंत्र युनिट उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
राज्यातील अमली पदार्थ विक्री व सेवनासंदर्भात सदस्य सुनील प्रभू यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी सदस्य सुधीर मुनगंटीवार, जयंत पाटील, अमीन पटेल, योगेश सागर आणि संजय क्षीरसागर यांनी उपप्रश्न उपस्थित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अमली पदार्थांचे उत्पादन, तस्करी आणि सेवन हे केवळ महाराष्ट्रासमोरील नव्हे तर संपूर्ण देशासमोरील गंभीर आव्हान आहे. केंद्र शासनाने देशव्यापी अमली पदार्थविरोधी मोहीम हाती घेतली असून त्याअंतर्गत राज्य शासनाने ‘Whole of Government Approach’ विकसित केला आहे. गृह विभागाच्या माध्यमातून विविध विभागांमध्ये समन्वय साधून अवैध अमली पदार्थांची शेती, लागवड, उत्पादन, व्यापार, वाहतूक, विक्री आणि सेवन यांवर नियंत्रण आणण्यासाठी व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अमली पदार्थांच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी राज्यभर जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानाद्वारेही जनजागृती करण्यात येत आहे. तसेच अमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ कायद्यात (NDPS Act) सुधारणा करण्याबाबत केंद्र शासनाला राज्य शासनाने सूचना पाठविल्या असल्याची माहितीही दिली.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, राज्य शासनाच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणानुसार NDPS कायद्यांतर्गत दोषी आढळणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, अमली पदार्थविरोधी कारवाईत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बढती, प्रोत्साहनपर लाभ आणि विशेष नियुक्ती देण्यात येणार आहे. अमली पदार्थविरोधी टास्क फोर्समध्ये तीन वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर इच्छेनुसार बदलीची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई पोलिसांनी गुजरात,तेलंगणा, उत्तर प्रदेशसह विविध राज्यांत जाऊन यशस्वी कारवाया केल्या आहेत. २०२५ मध्ये अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स आणि पोलीस यंत्रणेमार्फत तब्बल ५२३.१७ कोटी रुपयांचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. जानेवारी ते एप्रिल २०२६ या कालावधीत अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी १,१४२ गुन्हे दाखल करण्यात आले असून १,६२६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत २५४.५३ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. तसेच अमली पदार्थ सेवनाविरोधात ३,१९९ गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले.
तसेच मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मे २०२६ अखेर अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात ५२८ गुन्हे दाखल करून ६५५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच सेवन करणाऱ्या २,८५५ जणांविरोधात गुन्हे दाखल करून २,४५९ आरोपींना अटक करण्यात आल्याचे सांगितले.
उपप्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील आरोपी सलीम डोला याला परदेशातून अटक करून भारतात आणण्यात आले असून अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई सुरू आहे. कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ जाळून पूर्णतः नष्ट करण्यात येतात, त्यामुळे तो माल पुन्हा बाजारात येण्याची शक्यता राहत नसल्याचे स्पष्ट केले.
शेवटी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात सध्या अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची सात युनिट्स कार्यरत असून नव्याने पदनिर्मिती करून त्यांचा विस्तार करण्यात येणार आहे. तसेच अमली पदार्थांबाबत माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख गोपनीय ठेवून त्यांना बक्षीस देण्याची योजनाही राबविण्यात येणार आहे. मुंबई आणि परिसरातील व्यसनाधीन रुग्णांच्या पुनर्वसनासाठी विशेष केंद्रे उभारण्याकरिता जमीन उपलब्ध करून देण्याबाबत मुंबई महानगरपालिकेला निर्देश दिले जाणार आहेत. याशिवाय आरोग्य विभाग आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात व्यसनमुक्ती केंद्रे उभारण्याचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले.
तसेच मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, चित्रपट आणि इतर माध्यमांमधून होणाऱ्या अमली पदार्थांच्या उदात्तीकरणाबाबतही शासन गंभीर असून त्यावर नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.
Marathi e-Batmya