डोंबिवलीहून काश्मीरातील पहलगाम येथील बैसरण अर्थात मिनी स्विझरलॅड म्हणून ओखळले जाणाऱ्या ठिकाणी पर्यटनासाठी गेले होते. मात्र २२ एप्रिल रोजी दोन पाकिस्तानी आणि दोन स्थानिक दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात २६ जण पर्यटकांचा बळी गेला. डोंबिवलीतील तिघे आणि आणि पनवेल येथील देसले यांचे मृतदेह कालच मुंबईत आणण्यात आले. त्यानंतर आज अतुल मोने यांचा मुलगा आणि पत्नी आणि मुलीने तेथील दहशतवादी कृत्याचा घटनाक्रमच आयोजित पत्रकार परिषदेत यावेळी सांगितला.
यावेळी अतुल मोने यांच्या पत्नी अनुष्का यांनी सांगितले की, पहलगाम येथील बैसरण येथील टेकड्यांवर सौदर्यसृष्टीचा आनंद घेत होतो. पर्यटकांची गर्दीही होती. काही भागात खेळ सुरु आहेत म्हणून तेथे गर्दीही जमली आहे असे वाटले. काही पर्यटक घाईघाईने बैसरन टेकड्या उतरून पहलगामच्या दिशेने निघाले होते. आम्ही या गोष्टी गांभीर्याने घेतल्या नाहीत. काही क्षणात लष्करी वेशातील दोन दहशतवादी आमच्यासमोर उभे राहिले आणि पुढील प्रसंग सांगताना त्या भावविवश झाल्या आणि त्यांच्या मनाचा बांध फुटला.
तर त्यांच्या कन्या ऋचा मोने यांनी त्याही तेथे उपस्थित होत्या. त्यावेळी ऋचा मोने यांनी सांगितले की, पहलगाम मधील टेकड्यांवर पर्यटनाचा आनंद घेत असताना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पर्यटनाच्या ठिकाणी धावपळ होत असल्याचे दिसले. तर काही पर्यटक बैसरन टेकड्या उतरून पहगामच्या दिशेने घाईने निघाले होते. एके ठिकाणी गर्दी जमली होती, तिथे खेळ चालू असतील असे वाटले. काही क्षणात दोन लष्करी वेशातील दहशतवादी आमच्यासमोर कपाळावर गोप्रन कॅमेरा लावलेला असे उभे राहिले. त्यांनी घोळक्याने सर्व पर्यटकांना एकत्र येण्यास सांगितले. हल्लाचा अनुभव असलेल्या घोडे स्वारांना क्षणात दहशतवादी आले आहेत याची जाणीव झाली आणि आता काही तरी भयंकर होईल असे वाटले. त्यांनी पर्यटकांना आपण आपले जीव वाचवा असा सल्ला दिला. पर्यटकांना घोडेस्वारांनी दहशतवाद्यांसमोर झुकण्यास सांगितले. सांगण्यापूर्वीच काही पर्यटक झुकल्या अवस्थेत उभे होते असेही सांगितले.
पुढे बोलताना ऋचा मोने म्हणाल्या की, दहशतवाद, हल्ला या प्रकारचा कोणताही अनुभव नसल्याने पर्यटक हेमंत जोशी पर्यटक का झुकले, घोडेस्वार झुकण्यास का सांगतोय यामुळे अस्वस्थ झाले. त्यांनी धाडस करून आपण काय करताय असा प्रश्न केला. आम्ही काही करत नाही फक्त बसून रहा असे सांगत दहशतवाद्यांनी क्षणार्धात हेमंत जोशी यांच्या डोक्यात गोळी झाडल्याचे सांगत काहीशा भावविवश झाल्या.
याप्रकाराने संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी यांचे कुटुंबिय चांगलेच हादरले. किंकाळ्या, आक्रोश, हुंदके सुरु झाले. आम्हाला गोळ्या घालू नका, आम्हाला सोडा, असे आर्जव पर्यटक करत होते. झुकून बसलेल्या पर्यटकांना दहशतवादी मुस्लिम कोण, हिंदू कोण असे प्रश्न विचारत होते. हिंदू म्हणून संजय लेले यांनी हात वर केला म्हणून त्यांच्याही डोक्यात गोळी घालण्यात आली, लेले यांना गोळी लागताच ते कोसळले. अतुल मोने यांनाही हिंदू म्हणून हात वर केला होता, तर दहशतवाद्यांनी त्यांच्या पोटात गोळी मारली. ते जागीच निपचित पडले. हा हृदयद्रावक प्रसंग सांगताना ऋचा मोने आणि अनुष्का मोने यांना शोक अनावर झाला होता.
यावेळी अनुष्का मोने म्हणाल्या की, दहशताद्यांनी घरातील कर्त्या पुरुषांनाच मारले. प्रत्येक घरात त्यांची मुलं शिक्षण घेत आहेत. काही घरात कमावता कोणी नाही या गोष्टीचा विचार करून सरकारने मृत पर्यटकांच्या घरात शिक्षण घेत असलेल्या मुलांच्या शिक्षणाचा भार उचलावा त्यांना नोकरीत प्राधान्य मिळेल यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षाही व्यक्त केली.
पुढे बोलताना मोने कुटुंबियांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी महिला व मुले यांना हात लावला नाही, त्यांनी घरातील कर्त्या पुरुषांना मारले. मोदींचा उल्लेख करत काश्मीरमध्ये आतंक माजविला आहे असे दहशतवादी पर्यटकांना सुनावत होते. सामान्य पर्यटकांनी कसली दहशत माजवली आहे, कोणाचा राग निष्पाप पर्यटकांवर कशासाठी, पर्यटनासाठी धर्म लागतो का असा सवालही कुटुंबियांनी केले. हे क्रुर कृत्य करणाऱ्या दहशतवाद्यांना सरकारने पकडून त्यांचे डोळे, चामडी काढून जनतेसमोर ठेचले पाहिजे. पाकिस्तानला योग्य तो धडा शिकवला पाहिजे अशी मागणीही यावेळी केली.
Marathi e-Batmya