भाई जगताप यांची मागणी, बाबा सिद्दिकी यांच्या सुरक्षिततेतील त्रुटींची चौकशी करा महायुतीच्या काळात मुंबई ‘गुन्हेगारीत’ पुढारलेलं शहर

बदलापूरच्या घटनेत ताब्यात असलेल्या आरोपीला गोळ्या घालणारे पोलीस बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली तेव्हा कुठे होते, असा सवाल करत या प्रकरणाची चौकशीची मागणी करत महायुतीच्या काळात महिला सुरक्षित नाहीत, मुंबई शहर तर ‘गुन्हेगारीत’ दुसऱ्या क्रमांकावर आलं असल्याचा घणाघातही भाई जगताप यांनी केला. मुंबई काँग्रेसमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी मुंबई कॉंग्रेसच्या मीडिया प्रभारी छायनिका उन्नियाल, राष्ट्रीय प्रवक्ते चरणसिंग सप्रा, मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते, मॅथ्यू ॲन्थनी, निजामुद्दीन राईन, आनंद शुक्ला, अर्शद आझमी, आनंद शुक्ला, शकील चौधरी उपस्थित होते.

भाई जगताप पुढे बोलताना म्हणाले की, एका ज्येष्ठ नेत्यावर भर वस्तीत गोळ्या झाडल्या जातात. हल्लेखोरांना लोकांनी शस्त्रांसहित पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. मग पोलीस कुठे होते. हे इतकं सहज घडतं? बाबा सिद्दिकी सत्ताधारी पक्षात होते. त्यांना आलेल्या धमकीकडे का दुर्लक्ष करण्यात आलं? याची चौकशी फडणवीसांनी करायला हवी! मग गुन्हेगारांना फासावर द्या, अशी मागणीही यावेळी केली.

पुढे बोलताना भाई जगताप म्हणाले की, ताब्यात असलेल्या बदलापूर घटनेतील आरोपीला गोळ्या घालून मर्दुमकी करणारे पोलीस सिद्दिकींवरील हल्ल्यात कुठे होते? बदलापूर शाळेतील लहानमुलींचं शोषण करणारा तो एकटा नव्हता. या लहान मुलींच्या अश्लाघ्य क्लिप्स बनवल्या जात होत्या, अशी चर्चा आहे. यातील एका आरोपीला गोळ्या घालून बाकी आरोपींना संरक्षण देण्याचं काम फडणवीस करताहेत असा आरोपही यावेळी केला.

गुन्हेगारीबाबत बोलताना भाई जगताप म्हणाले की, महिलांवरील गुन्ह्याबाबत महाराष्ट्र आणि मुंबईची परिस्थिती चिंताजनक आहे. एनसीआरबी NCRB या सरकारी अहवालात मुंबई हे या गुन्ह्यांबाबत दुसऱ्या क्रमांकाचं शहर असल्याचं नमूद केलं आहे. वर्षभरात ७५२१ महिलांवर बलात्कार झाल्याचे हे आकडे सांगतात. रोज हे आकडे वाढत आहेत. १०५६८ महिलांवर हल्ले झालेत तर १८७२४ महिलांचं अपहरण झाल्याची नोंद आहे. दर तासाला ६ महिला अत्याचाराचा बळी होतायत. अशी आमच्या मुंबई आणि महाराष्ट्राची लज्जास्पद स्थिती आहे. मात्र निर्लज्ज फडणवीस आणि शिंदे सरकारवर याचा काहीच परिणाम होत नाहीय. मतांसाठी लाडकी बहिण म्हणत दीड हजार रूपये द्यायचे, आणि अत्याचारग्रस्त बहिणींकडे दुर्लक्ष करायचं हे महायुतीचं धोरण असल्याची टीकाही यावेळी केली.

पुढे बोलताना भाई जगताप म्हणाले की, दलित, अल्पसंख्य समाज कमालीचा असुरक्षित झालाय. दलितांची नग्न धींड काढली जातेय, ठेचून मारलं जातंय… या घटनांतील आरोपींना अटकही होत नाही. त्यांना गृहखात्याचं संरक्षण मिळतंय. अत्यंत जातीयवादी असं हे महायुतीचं सरकार आहे, असल्याचा आरोपही यावेळी केला.

भाई जगताप पुढे बोलताना म्हणाले की, भाजपाचा आमदार गणपत गायकवाड पोलीस स्टेशनमधेच फायरिंग करतो, सदा सरवणकरही तेच करतो, नगरसेवकांच्या हत्या होतायत. अभिषेक घोसाळकरवर कॅमेरा लावून गोळ्या झाडल्या गेल्या, गुन्हेगारांना काहीच धाक उरला नाही, श्रीमंतांच्या गाडी खाली माणसं चिरडणारा भाजपा नेते चंद्रकांत बावनकुळेंचा मुलगा सुरक्षित रहातो. ही गृहमंत्री फडणवीसांची काळीकुट्ट कारकीर्द असल्याचा आरोपही यावेळी केला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळाही शिंदे, फडणवीसांना नीट उभारता आला नाही अशी टीका भाई जगताप यांनी करत पुढे म्हणाले की, हा पुतळा कोसळला नाही तर महाराष्ट्राची अस्मिता कोसळली. यातील भ्रष्टाचार या सगळ्याला कारणीभूत आहे. मात्र यातील गुन्हेगारांना संरक्षण देण्याचं काम शिंदे-फडणवीस-पवार सरकार करतंय, आज मुंबई, महाराष्ट्रात महायुतीमुळे असुरक्षितता आणि अन्यायाचा अंधार पसरला आहे. पण या निवडणुकीतच यांचा पराभव करून इथली जनता नवी पहाट आणणार असल्याचा आशावादही यावेळी व्यक्त केला.

About Editor

Check Also

‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत इच्छुक प्रशिक्षकांनी ३१ डिसेंबर पर्यंत अर्ज करा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांसाठी प्रशिक्षकांना केले आवाहन

मिशन लक्ष्यवेध या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत टेबल टेनिस, कुस्ती, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स आणि शूटिंग या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *