उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल, वेळेआधी उमेदवारांचे अर्ज नाकारले कसे ? मंगळवारी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेनंतर अर्ज भरणाऱ्या राज्यातील विविध पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज कोणत्या कारणास्तव फेटाळले ?, अशी विचारणा उच्च न्यायालयाने सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (ईसीआय) केली. तसेच त्याबाबत मंगळवारी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा ३० ऑक्टोबर शेवटचा दिवस होता. त्यामुळे, यादिवशी सकाळी ११ नंतर दाखल झालेले किती उमेदवारांचे अर्ज नाकारण्यात आले, अशीही विचारणा करून त्यांची यादी सादर करण्याचे आदेशही न्या. आरिफ डॉक्टर आणि न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आणि सुनावणी मंगळवारी ठेवली. दरम्यान, भिवंडी मतदारसंघातही याच कारणास्तव अर्ज नाकारण्यात आल्याची बाब आणखी एका उमेदवाराने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्या अर्जावरही न्यायालयाने सुनावणी मंगळवारी ठेवली.

वांद्रे पश्चिम मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे (व्हीबीए) उमेदवार आकीफ अहम्मद दफेदार यांनी २९ ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल केला होता. परंतु, त्यांच्या कागदपत्रात काही त्रुटी राहिल्याने त्यांनी उमेदवार अर्जात दुरुस्ती करून ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११.४५ च्या सुमारास अर्ज सबमिट करण्यासाठी गेले असता त्यांचा अर्ज घेण्यास नकार दिला. सकाळी ११ नंतर अर्ज दाखल केल्याच्या कारणास्तव अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे रिटर्निंग ऑफिसरने (आरओ) दफेदार यांना सांगितले. त्याविरोधात दफेदार यांनी अँड. सय्यद अली हसन आणि अँड. इम्रान अन्सारी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ईसीआय अधिकारी निव्वळ सकाळी ११ नंतर अर्ज दाखल केल्यामुळे तो नाकारू शकत नाही. नामनिर्देशनपत्र निर्धारित वेळेच्या आत स्वीकारणे आवश्यक आहे आणि सकाळी ११ ही अंतिम अर्ज स्वीकारण्याची वेळ असूच शकत नाही, असा युक्तिवाद दफेदार यांच्यावतीने करण्यात आला.

सकाळी ११ हीच डेडलाईन कशी ?

निवडणूक आयुक्तांनी ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून नामनिर्देशनपत्रांची छाननी सुरू करण्याचे आदेश दिले होते आणि त्यामुळे त्या मुदतीबाहेरील अर्ज नाकारल्याचा दावा ईसीआयच्या वतीने अँड. अक्षय शिंदे यांनी केला. तसेच याचिकाकर्त्याने वैयक्तिक गुन्हेगारीची पार्श्वभूमी आणि आर्थिक तपशील यासारखी आवश्यक माहिती नामनिर्देशनपत्रांमध्ये भरलेली नसल्याचेही शिंदे यांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, सकाळी ११ हीच उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम वेळ कशी ? अंतिम अर्ज स्वीकरण्याची सकाळी १२ अथवा दुपारी १ वाजल्याची वेळ असती तर समजू शकलो असतो. जेव्हा, खुद्द कामाला सुरुवात होते तीच वेळ डेडलाईन कशी असू शकते?, दिवसभराचे संपूर्ण कामकाजाचे तास का डेडलाईन असू शकत नाहीत?, अशी प्रश्नांची सरबत्ती करून न्यायालयाने ईसीआयला मंगळवारीच याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

About Editor

Check Also

उदय सामंत यांचे आश्वासन, मुंबईतील उंच इमारतींसाठी अग्निसुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यात येणार विधान परिषदेत अर्धातास चर्चेला उत्तर देताना दिली माहिती

मुंबईमध्ये वाढत्या उंच इमारतींच्या पार्श्वभूमीवर अग्निसुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *