कल्याणचे भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि तेथील स्थानिक शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख यांच्यात एका जमिनीवरून वाद निर्माण झाला आणि त्या वादाचे पर्यावसन थेट पोलिस ठाण्यात गोळीबार झाल्याच्या घटनेत झाले. त्यानंतर हा मतदारसंघ भाजपाकडून पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुत्राला सोडणार का अशी चर्चा सुरु असतानाच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ श्रीकांत शिंदे यांची कल्याणमधून शिवसेना शिंदे गटाचे लोकसभा उमेदवार म्हणून नाव जाहिर केले. मात्र ठाणे लोकसभा मतदारसंघातून कोण उमेदवार हे ठरत नव्हते. अखेर या ही मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी नरेश मस्के यांचे नाव आज जाहिर करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वास्तविक पाहता एकेकाळचे मुळ शिवसेनेचे खंदे शिवसैनिक. मुंबईत उद्धव ठाकरे यांची सत्ता तर ठाण्यात स्व.आनंद दिघे यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांची सत्ता असल्याचे बोलले जात होते. तसेच मधल्या काळात शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे अशी चर्चाही राज्यात निर्माण चांगलीच सुरु झाली होती. कदाचीत याच सक्षमतेच्या बळावर पुढील मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चाही मधल्या काळात सुरु होती. मात्र भाजपाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना जमिन दाखविण्याची घोषणा केली आणि शिवसेनेचे सारे चित्रच पालटले.
दरम्यानच्या काळात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने राज्यात महाविकास आघाडी सरकारही स्थापन केले. नेमक्या याच कालावधीत शिवसेनेच्या अनेक आमदारांना ईडी अर्थात सक्तवसुली संचालनायच्या नोटीसा येण्यास सुरुवात झाली. त्याचा जोर इतका वाढला की, एकनाथ शिंदे यांचे एक खाजगी सचिव जवळपास दिड ते दोन महिने ईडीच्या रडारवर असल्याची आणि ठाण्यातून गायब झाल्याची चर्चा मंत्रालयात चांगलीच रंगली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे गुजरात मार्गे गुहावाटीला जाणे तेथून महाशक्तीच्या माध्यमातून राज्यात सत्तास्थानी येणे हा सर्वश्रुत इतिहास आहे. नेमक्या याच कालावधीत ठाणे शहर आणि जिल्ह्यात अनेकजण सक्रीय झाले.
या माध्यमातून भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांचे प्रकरण अद्यापही ताजे आहे. यापार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांना राजकिय धक्का देण्याचा निर्णय अनेक राजकिय धुरिणांनी घेतला आहे. त्यातच भाजपाच्या श्रेष्ठींनी मुख्यमंत्री शिंदे यांना कोणत्याही स्वरुपाची निवडणूकीची घोषणा तसेच उमेदवाराची घोषणा करण्यास अटकाव करण्यात आला होता अशी चर्चा आजही मंत्रालयाच्या राजकिय वर्तुळात अद्यापही सुरु आहे. त्यानुसार ठाणे आणि कल्याण येथील उमेदवाराची घोषणा शिंदे गटाकडून अद्याप करण्यात आलेली नव्हती असेही मुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळच्या गोटातून सांगण्यात येत आहे.
या सगळ्या घाडमोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या जनमानसातील प्रतिमा आणि वाढता असंतोष यावर दस्तुरखुद्द भाजपालाच अद्याप मार्ग काढता आला नाही. त्यामुळे अखेर शिंदे गटाचे खासदार असलेल्या विद्यमान खासदारांवरच त्या लोकसभेच्या जागा निवडूण आणण्याची जबाबदारी सोपविली. याशिवाय कल्याणचे विद्यमान खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र असल्याने त्यांची उमेदवारी कापली तर त्यातून आणखी चुकीचा संदेश भाजपाच्या विरोधात जाईल यामुळे अखेर श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर करूनही जवळपास एक महिन्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून अधिकृतरित्या डॉ शिंदे यांची उमेदवारी आज जाहिर करण्यात आली आहे. तर ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उबाठा गटाकडून राजन विचारे यांना पराभूत करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांचे सहकारी नरेश मस्के यांना उमेदवारी जाहिर केली.
उमेदवारी जाहिर कऱण्यात आल्यानंतर खासदार डॉ श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानी जात भेट घेतली.
लोकसभा निवडणूक – २०२४ साठी कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्री. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातून श्री. नरेश गणपत म्हस्के यांचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा !#Shivsena #LokasabhaElection2024 pic.twitter.com/XYJjTUy0r8
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) May 1, 2024
Marathi e-Batmya