वरळी बीएमडब्ल्यू हिट अँण्ड रन प्रकरण : आरोपी मिहिर शहाच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने ठेवले बोट युक्तिवाद पूर्ण; निर्णय ठेवला राखून

एखाद्या व्यक्तीला गुन्हा करताना प्रत्यक्ष पाहिले किंवा पकडले गेल्यास (रंगेहात) त्याला अटकेच्या कारणांची माहिती देणे, ही निव्वळ एक औपचारिकता ठरते, असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने गुरुवारी वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शहाच्या याचिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि याचिकेवरील निर्णय राखून ठेवला.

याचिकाकर्त्याला गुन्हा करताना प्रत्यक्ष पाहिले गेले आहे. तसे असतानाही त्याला अटकेचे कारण माहिती नाही? अटकेचे कारण सांगितले नाही म्हणून त्यांची अटक ही बेकायदा कशी ठरते? प्रत्येक प्रकरणातील तथ्य आणि परिस्थिती वेगवेगळी असते. त्यानुसार, कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करून न्या. भारती डांगरे आणि न्या. मंजुषा देशपंडे यांच्या खंडपीठाने याचिकेवर आश्चर्य व्यक्त केले. या प्रकरणात याचिकाकर्त्याने दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला फरफटक नेले. याचिककर्ता इतक्या घाईत होता की फास्टॅग कार्ड मागे विसरला, त्याचाही त्याला विसर पडला. त्यामुळे हे एक उदाहरण म्हणून घेण्यासारखे प्रकरण आहे. म्हणजेच एखाद्याची हत्या झाली असून आरोपीला केलेल्या कृत्याची माहिती असतानाही निव्वळ औपचारिकता म्हणून त्याला ताब्यात घेत असल्याची माहिती द्यावी लागते. सर्वकाही माहिती असूनही औपचारिकता पूर्ण लागते?, अशा शब्दात न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. तसेच अटक बेकायदा असल्याचा दावा करून दाखल केलेल्या शाहच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला. २१ नोव्हेंबरला निर्णय देणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

हिट अँड रन प्रकरणी मुख्य आरोपी मिहिर शहा आणि त्याचा चालक राजऋषी बिडावत यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकेला आव्हान दिले आहे. आपल्याला अटकेची कारणे सांगण्यात आली नव्हती. त्यामुळे, आपली अटक ही बेकायदा असल्याचा दावा करून मिहीरने त्याची तातडीने जामिनावर सुटका करण्याची मागणी केली आहे. कनिष्ठ न्यायालयाने आपल्याला सर्वप्रथम सुनावलेल्या पोलीस कोठडीचा आणि त्यानंतर दिलेल्या न्यायालयीन कोठडीचा आदेश रद्द करण्याची मागणीही मिहिरने केली आहे. त्याचप्रमाणे, आपली अटक बेकायदा असल्याने आपल्याला कोठडीत ठेवल्यास ते घटनात्मक आदेशाचे तसेच, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ५० चे उल्लंघन ठरेल, असा दावाही मिहीरने केला आहे.

दरम्यान, मिहीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते राजेश शहांचा मुलगा आहे. भरधाव वेगात बीएमडब्ल्यू चालवून कावेरी नाखवा (४५) या महिलेच्या मृत्यू झाला होता. मिहीरने ९ जुलै रोजी मद्यधुंद अवस्थेत बीएमडब्ल्यू कार चालवताना नाखवा दाम्पत्याच्या दुचाकीला दिलेल्या धडकेमुळे जमिनीवर पडलेल्या कावेरी यांना रुग्णालयात नेण्याऐवजी त्याने गाडीनेच दीड किमीपर्यंत फरफटत नेले होते. यात कावेरी यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर मिहीर घटनास्थळावरून पळून गेला. राजेश शहा यांनाही पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अटक केली होती. मात्र, त्यांना जामीन मिळाला आहे. मिहीर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचे आवाहन, पराभवाने खचून जाऊ नका, मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवा निवडणुकीतील पराभूत उमेदवारांबरोबर वर्षा गायकवाड यांची राजीव गांधी भवनमध्ये बैठक

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या जिद्दीने व दबावाला बळी न पडता लढा दिला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *