नाशिक-मालेगावच्या नगरसेवकांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेत व्यक्त केला ‘हा’ निर्धार ४० नगरसेवक उध्दव ठाकरे यांच्यासोबतच राहणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेच्या विरोधात बंड करत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकल्यानंतर अनेक आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटात जात आहेत. मात्र नाशिक आणि मालेगांव येथील नगरसेवकांनी मात्र शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेत आज मातोश्री येथील निवासस्थानी ठाकरे यांनी भेट घेतली.

नाशिक-मालेगावच्या आमदारांनी बंडखोरी करत शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर नाशिकमध्ये पक्षाला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर या प्रभागातील माजी नगरसेवकांनी ठाकरेंची भेट घेत त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. कितीही आमदार, खासदार फुटू देत, आम्ही उध्दव ठाकरे यांच्या सोबतच असणार, असा विश्वास माजी नगरसेवक राजाराम जाधव यांनी व्यक्त केला.

यावेळी या नगरसेवकांकडून शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याबाबतचे शपथपत्रही भरुन दिले. नाशिकच्या पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरेंनी चर्चा केली. तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि आगामी पक्षाच्या भूमिकेबाबतही चर्चा करण्यात आली. बंडखोरीनंतर नाशिक-मालेगावसोबत नांदगावात पुन्हा शिवसेनेची सत्ता आणण्याबाबत उद्धव ठाकरेंनी या माजी नगरसेवकांना मार्गदर्शन केले. आगामी निवडणुकीत पक्षाची रणनितीबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

शिंदे गट आणि उध्दव ठाकरेंमध्ये शिवसेना पक्षावरुन सुरु असलेला वाद आता निवडणूक आयोगापर्यंत पोहचला आहे. येत्या ८ ऑगस्टला आयोगात याबाबत सुनावणी होणार आहे. त्यामुळे ८ ऑगस्टपर्यंत बहुमताबाबत कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे निर्देश आयोगाने दोन्ही गटांना दिला. तसेच शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाणाबाबतही त्याच दिवशी फैसला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना कुणाची याबाबतच लवकरच निकाल लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान निवडणूक आयोगाच्या या नोटीशीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना निवडणूक आयोग नोटीस बजावू शकत नाही असा दावाही शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

About Editor

Check Also

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा सल्ला, ‘उद्योजक होताना टाटांचा आदर्श ठेवा’ रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा

आजच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर ती पदवी रोजगारात रूपांतरित होणे आवश्यक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *