अजित पवार यांचे कार्यकर्त्यांसमोर स्पष्टोक्ती, मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही उभ्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी सज्ज होऊया -सुनिल तटकरे

बेरजेचे राजकारण करत करत सर्व जाती धर्माच्या घटकांना सोबत घेऊन काम करुया. त्या सर्व घटकांनाही आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामावून घेऊन काम करतो हे वाटले पाहिजे आणि सभासद नोंदणी करून राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष उभा करुया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षप्रवेश कार्यक्रमात केले.

जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील असंख्य शरद पवार गटाच्या पदाधिकार्‍यांनी आज के. सी. कॉलेज सभागृहात झालेल्या कार्यक्रमात जाहीर प्रवेश केला.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, आम्ही राजकारणात किंवा सार्वजनिक जीवनात जात-पात, धर्म कधी पाळला नाही. अठरापगड जातींना घेऊन शिवरायांनी जसे राज्य केले. त्याचपध्दतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत आहे असेही यावेळी सांगितले.

अजित पवार पुढे म्हणाले की, शिवसेना तुम्हाला चालत असेल तर भाजपा का चालत नाही. काहीजण सोयीनुसार कार्यकर्त्यांना सांगत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेवढे आमदार होते त्यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावे असे ठरले होते. याला सर्वच आमदार साक्षीदार आहेत ही माहिती देतानाच मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही. सर्वाधिक सत्ता मी उपभोगली आहे अशी स्पष्ट कबुलीही दिली.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, लोकांचे प्रश्न सुटावे, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी काम करत आलो आहे. राज्यात उभारली जाणारी महापुरूषांची स्मारके भावी पिढ्यांना प्रेरणा मिळेल अशी कामे सरकार करत आहे असल्याचे सांगितले.

शेवटी बोलताना अजित पवार म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्तेशिवाय आता पर्याय राहिलेला नाही हे लक्षात घ्या असे सांगतानाच सर्वच क्षेत्रात हे तंत्रज्ञान वापरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता वापराशिवाय काहीच करता येणार नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरातून हाताला काम मिळणार असल्याचेही यावेळी सांगितले.

यावेळी पक्षात प्रवेश देत असल्याचे जाहीर करतानाच प्रवेशकर्त्यांचे अजित पवार यांनी पक्षात स्वागत केले.

उभ्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी सज्ज होऊ या -सुनिल तटकरे

उभ्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी सज्ज होऊया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केले.

खान्देशातील फार मोठी ताकद आज पक्षात आली त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी सर्वांचे स्वागत केले.

पक्षाची जुळलेली नाळ कायम ठेवलात आणि विचारांपासून कधी ढळला नाहीत त्याबद्दल प्रवेशकर्त्यांचे आभार मानले.

पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, राजकारणात आपला ठसा अजितदादांनी उमटवला आहे. दिलेला शब्द पाळणारा आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहणारा एकमेव नेता आहे असे सांगतानाच विक्रमी अर्थसंकल्प अजित पवार यांनी मांडला आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी नागपूर करार केला त्या विभागाचा विकास दादांच्या रुपाने आज पहायला मिळत आहे असेही यावेळी सांगितले.

सुनिल तटकरे म्हणाले की, सर्वाधिक उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवार यांनी घेतलेली आहे आणि भविष्यात अजून एक अपूर्ण राहिलेले स्वप्न आपल्या कार्यकर्त्यांना मिळून पूर्ण करायचे आहे असे आवाहन करत. खान्देशाचा विकास सर्वांना सोबत घेऊन करायचा आहे. भविष्यात हा विकास पक्षाच्यावतीने करण्यात येईल असेही यावेळी सांगितले.

यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतिश पाटील यांनी आपले विचार मांडले.

जळगाव जिल्हयातील माजी मंत्री सतिश पाटील , माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार दिलीपराव सोनवणे, धुळ्याचे माजी आमदार प्रा. शरद पाटील, उत्तरविभागीय अध्यक्ष शरद पवार गटाच्या नेत्या तिलोत्तमाताई पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज जाहीर प्रवेश केला. याशिवाय जळगाव, धुळे, नंदुरबार, रावेर येथील जिल्हा परिषद, जिल्हा बँकेचे संचालक, पंचायत समिती, बाजार समिती मधील शरद पवार गटातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांनीही प्रवेश केला.

माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील,आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार अमोल मिटकरी, सुरेखाताई ठाकरे,प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार, भुईखेडकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *