मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्यापालांच्या अभिभाषणानंतर विधानसभेचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वैधानिक विकास महामंडळाची स्थापना आणि निधीबाबतचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांनी ती १२ आमदारांची यादी मंजूर केल्यानंतर लगेच संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वैधानिक महामंडळाची स्थापना करण्यात येणार असल्याचे उत्तर देताच संतापलेल्या फडणवीसांनी बघु ती यादी कशी मंजूर होतेय असा इशारा देत भारतीय राज्य घटनेने दिलेला हक्क आम्ही मिळविणारच असा इशारा दिला.
विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्यानंतर लगेचच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वैधानिक महामंडळाचा प्रश्न उपस्थित केला. दरवर्षी राज्याच्या अर्थसंकल्पिय अधिवेशाच्यावेळी वैधानिक महामंडळाची स्थापना तसेच त्यांना विकास कामांसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद केली जाते. मात्र वैधानिक महामंडळावरील सदस्यांच्या नियुक्तींची मुदत संपुन गेली तरी त्याच्या स्थापनेविषयी आणि निधीबाबत अद्याप कोणतीच हालचाल नसल्याबाबतचे फडणवीस म्हणाले. तसेच अजित पवारांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करत असल्याचे जाहिर केले.
त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार बोलण्यास उभारत म्हणाले की, राज्य सरकारला वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करायचीच आहे. राज्यपालांनी ती १२ आमदारांची यादी मंजूर केली की आम्ही लगेच महामंडळाची स्थापना करणार आहोत. तसा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे स्पष्ट केले.
त्यावर फडणवीस यांनी संतापून केवळ १२ आमदारांसाठी मराठवाडा, विदर्भाचे भवितव्य टांगणीला लावणार का? असा सवाल उपस्थित करत भारतीय राज्य घटनेने दिलेला अधिकार आहे. सरकार जर या गोष्टी करणार नसेल तर हा सरळसरळ मराठवाडा आणि विदर्भावर अन्याय आहे. आमचा हक्क आम्हाला नाही दिला तर तो आम्ही मिळवू असा इशारा दिला.
त्यानंतर भाजपाचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रथेनुसार राज्य सरकारने मराठवाडा, विदर्भाच्या विकासाकरीता स्थापन करण्यात आलेल्या वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करणे आवश्यक आहे. यासंदर्भात अजित पवार यांनी वैधानिक मंडळाची आढावा बैठक घेतली. त्यात मागील काळात जास्त निधी दिल्याचे आढळून आले. तरीही वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करा आणि त्यासाठी निधीची तरतूद करा असे मी ७ वेळा हात जोडून विनंती करतोय असा टोला लगावला. तसेच अजित पवारांच्या भूमिकेचा मी ही निषेध करत असून सभात्याग करत असल्याचे जाहिर केले.
त्यावर अजित पवार यांनींही मुनगंटीवारांना प्रतित्तुर देत म्हणाले की, मी १० वेळा हात जोडून तुम्हाला विनंती करतो. पण आधी आमची १२ आमदारांची यादी मंजूर झाली पाहिजे. वैधानिक महामंडळाची स्थापना करायचीच आहे. त्याबाबत राज्य सरकारचे धोरणही स्पष्ट आहे. त्यात कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही.
Marathi e-Batmya