विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने बारामती विधानसभा मतदारसंघात काका-पुतण्यामधील लढाईचा दुसरा अंक सुरु आहे. या निवडणूकीत शरद पवार विरुद्ध अजित पवार हा अंक राज्याच्या राजकारणातील पाहिल्यानंतर अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार यांच्यातील नवा काका-पुतण्याचा अंक पाह्यला मिळत आहे. या निवडणूकीच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाचा एकप्रकारे कस लागणार आहे.
या पार्श्वभूमीवर विधानसभा प्रचाराची सांगता आज होत असताना महाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अजित पवार यांची स्वतःची शेवटची सभा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्यासाठी शरद पवार यांची शेवटची सभा पार पडली. शरद पवार यांच्या सभे आधी अजित पवार यांची सभा पार पडली.
या सभेत बोलताना अजित पवार यांनी एक जुनी आठवण सांगत म्हणाले की, शरद पवार यांनी पहिल्यांदा बारामती विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी माझ्याकडे सोपविली. त्यावेळी आपल्याला भीती वाटत होती. शरद पवार यांनी माझ्याकडं बारामतीचं प्रतिनिधीत्व दिल्यानंतर मला वाटतं होते की, शरद पवार यांच्यासारखा नेता बारामतीकरांचं प्रतिनिधीत्व १९६७ ते १९९० पर्यंत असं प्रतिनिधीत्व करतो, तिथे आपण जायचं आणि त्यात जर कमी पडलो तर बारामतीकर आपली बिन पाण्यानंच करतील, बाकी काही ठेवणारं नाही असं वाटत होतं असेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, लोक म्हणतील साहेब इतकं काम करतायत आणि हा तर झोपतोय तेव्हांपासूनच माझी झोप गेली. लवकर उठायची सवय लागली आणि रात्री उशीरापर्यंत काम करायची सवय लागली. तेव्हापासून आजपर्यंत विकासाच्याबाबत मागे वळून बघितलं नसल्याचंही यावेळी सांगितले.
आणखी एका घटनेचा उल्लेख करत अजित पवार यांनी किस्सा सांगताना म्हणाले की, मला एकानं सांगितलं मी विचारलं कारे बाबा आपण एवढं संगळं काम करतो पण लोक वेगळा निर्णय का घेतात, त्यावर ते म्हणाले की, दादा तुमचं काय आहे, कुणी आलं की, तुम्ही तुमच्या पीएला सांगता लाव फोन, लगेच फोन लावता आणि त्याचं लगेच काम मार्गी लावता, बऱ्याचदा तिथल्या कामामुळे आलेल्या त्या माणसाला त्या कामाची किंमतच रहात नाही. जर दोन-चार हेलपाटे मारायला लावले तर त्या कामाची किंमत कळते असे आपल्याच भागातल्या वस्तादाने सांगितल्याचं सांगितले.
तसेच त्याबाबत अजित पवार यांनी त्याच व्यक्तीने सांगितलेल्या गोष्टीची आठवण सांगताना म्हणाले की, तुम्ही बोलताना तहान लागल्यावर पाणी मागता इथे तहान लागायच्या आधी पाणी तुम्ही देता. त्यामुळे त्याला काहीच किंमत नाही. न सांगता रस्ता होतोय, न सांगता पाण्याच्या कॅनल सुटतोय त्यामुळे गणित चुकतंय असे सांगितल्याचं सांगत ठीक आहे ते त्याचं मत होतं असे सांगायलाही अजित पवार विसरले नाही.
Marathi e-Batmya