Breaking News

अंबादास दानवे यांचा खोचक टोला, बेजबाबदार वागणाऱ्या महायुती सरकारला बाय बाय… महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत अंबादास दानवे यांचा निर्धार

शेतकरी व जनतेच्या प्रश्नांकडे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री बेजबाबदारपणे वागत आहेत. सामाजिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करून राजकीय वातावरण तापवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. एकप्रकारे राज्याला अधोगतीकडे नेण्याच काम महायुती सरकार करत असून या पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असून महायुती सरकारला बाय बाय करणार असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत दानवे बोलत होते.

पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, नुकतीच राज्यातील सर्व बँकांची बैठक पार पडली. मात्र राष्ट्रीयकृत बँकांनी ५० टक्क्यांच्यावर शेतकऱ्यांना कर्ज दिले नाही. सीबील स्कोर तपासणी शिवाय शेतकऱ्यांना कर्ज दिले जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री यांनी केली होती. मात्र सीबीलवरून कर्ज नाकारणाऱ्या एकाही बँकेवर सरकारने कारवाई केली नसल्याचा आरोप केला.

अंबादास दानवे पुढे बोलताना म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री असलेले अजित पवार जीएसटी कौन्सिलसारख्या बैठकीला गैरहजर राहतात. शेतकऱ्यांच्या आयुधांवर १८ टक्के जीएसटी लावून शेतकऱ्यांची सरकारकडून पिळवणूक सुरू आहे. याला सर्वस्व त्रिमूर्ती सरकार जबाबदार असल्याची टीकाही यावेळी केली.

अंबादास दानवे म्हणाले की, राज्यात पुणे अपघात, नीट घोटाळा, स्पर्धा परीक्षेतील गैरव्यवहार समोर आला आहे. डोंबिवली येथील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात दोनदा स्फोट झाला, या घटनेलाही सरकारचा बेजबाबदारपणा असल्याचा ठपका ठेवत नव्याने सुरू झालेल्या कोस्टल रोडमध्ये गळती, अटल सेतू महामार्गावर भेगा पडल्या आहेत. स्पर्धा परीक्षांमधील घोटाळा यामुळे युवकांमध्ये असंतोष आहे. राज्यात मोठया प्रमाणात गैरप्रकार सुरू असून सरकार याकडे डोळेझाक करत आहेत. यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सरकारचे
वाभाडे बाहेर काढणार असल्याचा इशाराही यावेळी दिला.

पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, शेतकरी, सामान्य जनता यांच्या प्रश्नी महायुती सरकार असंवेदनशील आहे, त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या सत्ताधाऱ्यांच्या चहापान कार्यक्रमावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकत असल्याची भूमिका घेतल्याची माहितीही दिली.

या पत्रकार परिषदेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधिमंडळातील काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, आमदार सतेज पाटील, आमदार भाई जगताप, आमदार राजेश राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, शेकापचे आमदार जयंत पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अजय चौधरी, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी उपस्थित होते.

Check Also

लिफ्टमधून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस, तर चंद्रकांत पाटील थेट दालनात विधिमंडळ अधिवेशाच्या पहिल्याच दिवशी या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ

लोकसभा निवडणूकीपाठोपाठ राज्य विधानसभा निवडणूकीची तयारी जवळपास सर्वच राजकिय पक्षांनी सुरु केली आहे. त्यातच नुकत्याच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *