मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणात स्पष्ट वक्ता, अचूक टायमिंग साधणारा नेता म्हणून मनसे प्रमुख राज ठाकरे यांची ओळख आहे. मात्र गेल्या ९ वर्षापासून राज ठाकरे अर्थात मनसे पक्षाला विधानसभा, लोकसभा आणि महानगरपालिकांमध्ये सपाटून मार खावा लागत आहे. त्यामुळे या पराभवाबद्दलची उद्विग्नता पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी व्यक्त करत मतदानाच्यावेळी लोक जातात कुठे असा सवाल स्वतःबरोबरच पक्षाच्या कार्यकर्त्यांना केला.
नवी मुंबईत आयोजित मनसेच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
विद्यमान राजकिय परिस्थितीत शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सत्ता हाती नसताना लाखोंच्या सभा गाजविण्याची नोंद राज ठाकरे यांच्या नावावर आहे. मात्र त्यांच्या सभांना ऐन निवडणूकीच्या कालावधीत लाखोंनी सभा घेवूनही त्यांच्या पक्षाचे उमेदवार विजयी होताना काही दिसत नाही. तरी त्यांचा सभा घेण्याचा किंवा उमेदवार उभे करण्याचा उस्ताह कमी होताना दिसत नसल्याबद्दल सर्वच राजकिय पक्षांकडून कौतुक करण्यात येते.
मात्र राज्याच्या राजकारणात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपाची जी एक विश्वासार्हता निर्माण झाली आहे. तशी विश्वासार्हता राज ठाकरे यांच्या मनसे यांच्याबाबत अद्याप निर्माण होताना दिसत नाही. नाशिक महानगरपालिकेची सत्ता हाती आल्यानंतर तेथील त्यांच्या कारभाराची दखल सर्वानींच घेतली. मात्र पाच वर्षानंतर पुन्हा निवडणूकीला सामोरे गेल्यानंतर तेथील सत्ता हातातून गेल्याचे चित्र दिसायला लागले.
सुरुवातीच्या काळात राज ठाकरे यांच्या प्रत्येक भाषणात एकदा मनसेच्या हाती सत्ता सोपवून बघा असे आवाहन सातत्याने करण्यात येत होते. याच आवाहनाच्या काळात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुती सुमने उधळण्यास सुरुवात केली. मात्र लोकसभा निवडणूकीच्यावेळी फक्त शिवसेनेची मते विभागली जाईल अशाच ठिकाणी चांगले उमेदवार दिले. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होवून त्याचा फटका मनसेला बसल्याचे पाह्यला मिळाल्याचे मनसेमधील एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
नेमक्या याच कालावधीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये भेट घेतल्याची क्लीप उघडकीस आली. त्यामुळे तर राज्याच्या राजकारणात त्यांच्याविषयी संशयाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
या कालावधीनंतर २०१९ च्या लोकसभा निवडणूकीवेळी मनसेकडून शेवटच्या क्षणापर्यंत ही निवडणूक लढवायची कि नाही याबाबत संदिग्धता ठेवत ऐन शेवटच्या क्षणी उमेदवारांची याची जाहीर केली. तसेच या कालावधीत ज्या जाहीर सभा घेतल्या त्या सर्व सभांचा खर्च काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने केल्याची चर्चा भाजपाच्यावतीने घडवून आण्यात आली. विशेष म्हणजे नेमक्या याच कालावधीत एकेकाळी भाजपा आणि नरेंद्र मोदी यांचे समर्थन करणारे राज ठाकरे एकदम टीकाकार बनल्याचे चित्र राज्यातील जनतेला पाह्यला मिळाले. त्यामुळे जनतेमध्ये राज हे भाजपाचे राजकिय मित्र कि शत्रु असाच प्रश्न निर्माण झाला. याचा फटका निवडणूकीत बसल्याचे त्यांनी सांगितले.
या सर्व गोष्टींवर पांघरून घालून नव्याने राजकिय गणिते मांडण्यासाठी सर्वच पक्षांनी सुरु केलेला शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष आणि हिंदूत्वाचा नारा देण्यास मनसेनेही सुरु केले. त्यासाठी थेट मनसेचा नवा झेडा भगवाधारी करत त्यावर शिवमुद्रेचे प्रतिबिंब उमटविले. मात्र तरीही नागरीकांच्या मनात राज ठाकरे पर्यायी मनसेविषयी विश्वासार्हता निर्माण झाली नाही. त्यातच देशभरात सीएए कायद्याला विरोध करण्यात येत असताना त्यांनी मात्र समर्थनार्थ मोर्चा काढला. त्यामुळे मनसेच्या विरोधात आधीच निर्माण झालेल्या अविश्वासाच्या वातावरणाला आणखीनच बळकटी मिळाल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
इतक्या घटना घडल्यानंतर एकदा राजकिय विश्वास उडाल्यानंतर जनतेचा पुन्हा कसा विश्वास बसणार असा प्रतिप्रश्न भाजपामधील एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केला.
त्यामुळे आजच्या सभेत राज ठाकरे यांनी मतदानाच्या दिवशी लोक कुठे जातात असा सवाल उपस्थित करण्यापेक्षा स्वतःची राजकिय विश्वासर्हाता वाढवावी असा मित्रत्वाचा सल्लाही दिला.
Marathi e-Batmya