मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, देशाला ‘संपन्न ऊर्जा’ राष्ट्र बनविण्यासाठी महाराष्ट्राचे बळ मिळणार राज्य शासनाचा अणुऊर्जा निर्मितीसाठी कंपन्यांशी सामंजस्य करार, २५, ४०० मेगावॅट अणुऊर्जा व १,२३,५०० रोजगार निर्मिती, एकूण गुंतवणूक ६,५०,००० कोटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवून देशात शून्य कार्बन उत्सर्जन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तीसाठी महाराष्ट्र पुरेपूर प्रयत्न करीत आहे. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक ही देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्यात अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांना शासनाच्यावतीने संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

मंत्रालयात आयोजित बैठकीत अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये राज्य शासनासोबत चार कंपन्यांचे सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये एनटीपीसीएल (नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड), अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, ललितपुर पावर जनरेशन कंपनी लिमिटेड (बजाज उद्योग समूह) यांचा समावेश आहे. बैठकीला पारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, एनटीपीसी लिमिटेडचे मुख्य महाव्यवस्थापक ए. पी. सामल, अदानी पॉवर कंपनीचे बिझनेस हेड विवेक शर्मा, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या न्यूक्लिअर एनर्जी बिजनेसचे अध्यक्ष रंजय शरण आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यामध्ये स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. स्वच्छ ऊर्जा निर्मितीमध्ये अणुऊर्जा ही अत्यंत महत्त्वाची आहे. या क्षेत्रात होत असलेल्या गुंतवणुकीतून राज्य ऊर्जा निर्मितीमध्ये अधिक वेगाने प्रगती करणार आहे. ही गुंतवणूक केवळ ऊर्जा निर्मितीसाठीच लाभाची नसून त्यामुळे रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. स्वच्छ ऊर्जा निर्मितीमध्ये महाराष्ट्र नेहमी देशात अग्रेसर असणार आहे.

शेवटी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कंपन्यांनी सामंजस्य करार प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये आणण्यासाठी गतीने कार्यवाही करावी. संबंधित कंपन्यांनी प्रकल्पाच्या जागांचे सर्वेक्षण करावे. या कामी राज्य शासनाचा संबंधित विभाग त्यांना सहकार्य करेल, असेही म्हणाले.

याप्रसंगी ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला व कंपन्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांमध्ये करारांचे आदान-प्रदान करण्यात आले.

करारामुळे होणारी अणुऊर्जा व रोजगार निर्मिती

अदानी पॉवर लिमिटेड कंपनी राज्यात १ लाख ५० हजार कोटींची गुंतवणूक करणार असून त्यातून ६ हजार मेगावॅट ऊर्जा निर्मिती होईल. तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या १२ हजार रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज २ लाख कोटी रुपयांचीगुंतवणूक करणार आहे. यामधून ७२०० मेगावॅट ऊर्जा निर्मिती व एक लाखाच्यावर रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच एनटीपीसी लिमिटेड १ लाख कोटींची गुंतवणूक करणार असून ७२०० मेगावॅट ऊर्जा निर्मिती अपेक्षित आहे. यामध्ये ५ हजार रोजगार निर्मिती होईल. ललितपुर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (बजाज उद्योग समूह) राज्यात २ लाख  कोटींची गुंतवणूक करणार  आहे. यामधून  पाच हजार मेगावॅट ऊर्जा निर्मिती आणि ३ हजार रोजगार निर्मिती होणार आहे.  अशाप्रकारे राज्यात एकूण ६ लाख ५० हजार कोटींची गुंतवणूक होणार असून २५ हजार ४०० मेगावॅट इतकी ऊर्जा निर्मिती आणि १ लाख २३ हजार ५०० रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती, ई-चलन संदर्भातील मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेऊ वाहतूकदारांना न्याय देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करणार

कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पालकमंत्री प्रकाश आबिटकर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *