नाना पटोले यांच्या टीकेवर मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, विरोधक त्या चष्म्या… सगळं समोरच दिसतंय की

शिंदे-फडणवीस सरकारच्या खातेवाटपात भाजपाने स्वतःकडे महत्त्वाची खाती ठेवली आणि शिंदे गटाला केवळ झाडी, डोंगर दिल्याची खोचक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. या टीकेबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी बंडखोर शिंदे गटाचे नेते व राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, खातेवाटपाचं काम आम्ही खूप समन्वयाने केलं. भाजपा आणि शिवसेना युतीकडे विरोधक त्यांच्या डोळ्यात लागलेल्या चष्म्याप्रमाणे पाहत आहेत, असे सूचक वक्तव्य केले.

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर ते जालन्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

अब्दुल सत्तार म्हणाले, भाजपाने शिंदे गटाला झाडी, डोंगर दिला की शेती, उद्योग दिला हे सर्वांसमोर आहे. खातेवाटपाचं काम आम्ही खूप समन्वयाने केलं. भाजपा आणि शिवसेना युतीकडे विरोधक त्यांच्या डोळ्यात लागलेल्या चष्म्याप्रमाणे पाहत आहेत. मात्र, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्या माध्यमातून आमच्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे. महाराष्ट्राचे अनेक प्रश्न आहेत. त्यांना गतीमान कारभारातून सोडवण्यासाठी आमचं सरकार काम करेल असा विश्वास दाखविला.

एकनाथ शिंदे १८-१८ तास काम करतात. त्यांच्या कामाचं मुल्यमापन केले पाहिजे. केवळ विरोधाला विरोध करू नये. देवेंद्र फडणवीस हेही १५-१८ तास काम करतात. त्यांनी आता मंत्र्यांवर काही जबाबदाऱ्या दिल्या आहेत. त्यामुळे मंत्र्यांना काम करावं लागेल. या कामाचा ते प्रत्येक महिन्याला, तीन महिन्याला आढावा घेतील. कोणत्या खात्यात काय काम केलं, कशा पद्धतीने काम केलं अशाप्रकारे मंत्र्यांच्या कामाचं मुल्यमापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जनतेने ज्या अपेक्षेने ही जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी पार पाडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे १८ मंत्री काम करतील. केंद्र व राज्य सरकार सोबत काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील काळात केंद्र व राज्याच्या वादात अनेक कामं अडकली होती. ती सर्व कामं मार्गी लावण्यासाठीही प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *