एकनाथ शिंदे यांची टीका, खोक्यांवरुन आरोप करणाऱ्यांना जनतेने खोक्यांमध्येच बंद… तुमच्याकडे परिवारवाद तर आमचा महाराष्ट्रवाद

सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण टाकलेल्यांकडे परिवारवाद आहे तर आमचा महाराष्ट्रवाद आहे. त्यांचा फेक नरेटिव्ह तर आमचे काम पॉझिटीव्ह अशा शब्दांत शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उबाठावर हल्लाबोल केला. रत्नागिरी येथे आयोजित जाहीर आभार सभेत ते बोलत होते.

सभेपूर्वी उबाठा गटाचे माजी आमदार सुभाष बने, उबाठा जिल्हा प्रमुख विलास चाळके, माजी जिल्हा परिषद बाळशेठ जाधव, प्रशांत सुर्वे, तालुका प्रमुख संदीप सावंत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, पक्षात कोणी चांगले काम केले की त्याचे खच्चीकरण करण्याचे काम काहीजणांनी पूर्वी केले. तो अनुभव रामदास कदम. नारायण राणे आणि मी देखील घेतला. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी घरादारांवर तुळशीपत्र ठेवून अंगावर केसेस घेतल्या म्हणून शिवसेना मोठी झाली. मात्र धनुष्यबाण आणि शिवसेना गहाण टाकण्याचे पाप तुम्ही केले. तो धनुष्यबाण सोडवण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले. तरीही आरोप थांबत नाहीत कारण सुंभ जळाला तरी पीळ जात नाही. जनता जनार्दनाने लोकशाहीचा अवतार घेऊन कोकण भूमीत शंकासूर गाडला, अशी टीकाही यावेळी केली.

एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, अडीच वर्ष खोक्यांवरुन आरोप करत राहिले पण निवडणुकीत त्याच खोक्यांमध्ये जनतेने तुम्हाला बंद करुन टाकले, अशी घणाघाती टीका करत त्यांचा अजेंडा राजनिती आहे तर आमचा विकासनिती, त्यांचा अजेंडा करप्शन फर्स्ट तर आमचा आहे नेशन फर्स्ट आहे. महाराष्ट्रात होती दाढी म्हणून उद्ध्वस्त झाली महाराष्ट्र विरोधी आघाडी आणि सुरु झाली विकासाची गाडी, असा टोला लगावत या दाढीला हलक्यात घेऊ नका असा इशाराही यावेळी दिला.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने गौरव झाला तर त्यावरही टीका केली. लाडकी बहिण योजना, लाडका भाऊ योजना, ज्येष्ठांसाठी योजना अशा कुठल्याही योजना बंद होणार नाहीत. सरकारने पूर्ण विचार करुन योजना लागू केल्या आहेत आणि मतदारांनी महायुतीला भरभरुन मतदान केलेय म्हणून इतिहासात नोंद होईल, असा ऐतिहासिक विजय मिळवला, घरात बसून सरकार चालत नाही तर लोकांमध्ये जावे लागते, फेस टू फेस काम करावे लागते, असा टोलाही उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, सागरी महामार्गाचे काम सुरु आहे. मुंबई गोवा महामार्ग लवकरच पूर्ण करु तसेच मुंबई सिंधुदुर्ग अँक्सेस कंट्रोल एक्सप्रेस हायवे केला जाणार आहे. कोकणच्या जिल्ह्यांचा अनुशेष भरुन काढणार, रत्नागिरी एमआयडीसीमध्ये ३० हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे यातून ३८ हजार रोजगार उपलब्ध होतील. आंबा, मासे आणि पर्यटनाला चालना देण्यात आली आहे. कोकणात कोयनेत वाहून जाणारे ६७ टीएमसी पाणी थांबवण्यासाठी काम सुरु झाले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गासाठी कोकण विकास प्राधिकरण केले आहे. यामाध्यमातून कोकणचा विकास होईल. कोकणात एकपेक्षा एक चांगले नेते शिवसेनेत येत आहेत. कोकणचा कॅलिफोर्निया करायचे असे म्हणण्याऐवजी आता कॅलिफोर्नियाला कोकण व्हावेसे वाटले पाहिजे, असा कोकण विकसित करायचा आहे, असा निर्धारही यावेळी व्यक्त केला.

एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, कोकणात शिवसेनेने ९ जागा लढवल्या आणि ८ जिंकल्या तर महायुतीने १५ जागा लढल्या आणि १४ जिंकल्या. आपला स्ट्राईक रेट ९५ टक्के झाला. काहीजण म्हणाले होते एकनाथ शिंदे सोबत गेलेले एकही आमदार निवडून येणार नाही तर मी सभागृहात म्हणालो होतो कि शिवसेना भाजपा महायुतीचे २०० हून अधिक आमदार निवडून आणू आणि जनतेच्या भरभरुन आशिर्वादाने महायुतीचे २३२ आमदार निवडून आले. उबाठापेक्षा शिवसेनेला १५ लाख मते जास्त मिळाली आणि त्यांच्या तुलनेत फक्त ८० जागा लढवल्या आणि ६० आमदार निवडून आणले. बाळसाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार कोण हे जनतेने निवडणुकीत ठरवून टाकले असल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, अडीच वर्षांपूर्वी बंद पडलेल्या महाराष्ट्राला चालना दिली. राज्यात लाडकी बहिण, लाडका भाऊ योजना राबवल्या. सत्ता येते आणि जाते पण बाळासाहेब म्हणायचे एकदा नाव गेलं की पुन्हा मिळवता येत नाही. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून मिळालेली ओळख ही सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. शरिरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत महाराष्ट्राल समर्पित काम करेन, असे सांगत सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे. सुरुवात अडीच वर्षांपासून झालीय, आता विधानसभेत मिळालेल्या अभूतपूर्व विजयाने आमची जबाबदारी वाढलीय, असेही यावेळी सांगितले.

एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, शिवसेना घराघरात आणि गावागावात पोहचवण्यासाठी सदस्य नोदंणी वाढवा. शिवसेनेत येणाऱ्या लोकांच्या विश्वासाला कदापी तडा जाऊ देणार नाही असे आश्वासन देत कार्यकर्ते, जनता हीच आमची दौलत, ऐश्वर्य आणि ताकद आहे असेही यावेळी सांगितले

यावेळी शिवसेना नेते रामदास कदम, उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालक मंत्री उदय सामंत, गृहराज्य मंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, आमदार निलेश राणे, राजन साळवी आदी नेते उपस्थित होते.

About Editor

Check Also

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहिती, एकल महिला धोरणासाठी मसुदा समिती गठीत विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत आणि अविवाहीत महिलासांठीचे धोरण

राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *