हर्षवर्धन सपकाळ यांचा निर्धार, ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ची शिकवण व प्रेरणेने वाटचाल करणार भाजपा सरकारची अवस्था दिल्लीत मुजरा, गल्लीत गोंधळ सारखी, डान्सबार पुन्हा सुरु करण्यास काँग्रेसचा विरोध.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरापगड जातीच्या मावळ्यांच्या साथीने स्वराज्य उभे केले. बलाढ्य शुत्रूच्या विरोधात गनिमी कावा पद्धतीने त्यांनी लढाई लढली, तीच आमची प्रेरणा आहे. शिवाजी महाराज केवळ औरंगजेब, निजामशाह, आदिलशाह यांच्याशीच लढले नाहीत तर तत्कालीन धर्मव्यवस्थेशी त्यांना लढा द्यावा लागला. या लढ्यात वारकरी संप्रदाय, चक्रधर स्वामी, महात्मा बसवेश्वर यांच्या प्रवाहाची कास शिवाजी महाराजांनी धरली होती. बहुजन हिताय, बहुजन सुखाय ही महाराजांची शिकवण आहे, ती शिकवण त्यांची प्रेरणा घेऊनच आम्ही वाटचाल करु, असा निर्धार काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.

काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली, त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते, हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, शिवाजी महाराजांविरोधातही अनेक प्रवृत्ती काम करत होत्या, त्यांच्या राज्याभिषेकालाही विरोध केला होता, त्याच प्रवृत्ती आजही आहेत. शिवाजी महाराज यांची लढाई राज्यव्यवस्था व तत्कालीन अर्थव्यवस्थे विरोधातही होती, तशाच पद्धतीने आज सत्ता ही मूठभर लोकांच्यासाठी राबवली जात आहे. धर्मव्यवस्थेतही मूठभर लोक आम्हीच सर्वेसर्वा असे माननारे आहेत, या प्रवृत्तींच्या विरोधात आम्हाला लढावे लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेचे व त्यांनी दिलेल्या सामाजिक दर्शनाच्या माध्यमातूनच वाटचाल करू असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हणजे महाराष्ट्र धर्म जागवावा ही शपथ घेण्याचा दिवस आहे. आपण सर्व जाती धर्माचे लोक एक आहोत, हे आपले स्पिरीट आहे, आपला संस्कार आहे. या निमित्ताने स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या जीवनावरील ‘छावा’ चित्रपट सरकारने करमुक्त करावा, अशी मागणीही यावेळी केली.

गड किल्याच्या विषयावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, गड किल्ले आपल्या अस्मितेचे विषय आहेत, सत्तेत येण्यासाठी लाडकी बहिण योजनेकडे वारेमाप पैसा वळवला जाऊ शकतो तर आपल्याला प्रेरणा देणाऱ्या गड किल्ल्याकडेही पहावे, त्याचे खाजगीकरण करु नये, पर्यटकांच्यासाठी म्हणून गड, किल्ल्यावर बार, पब सुरु करु नयेत अशी मागणीही यावेळी केली.

डान्सबार संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राज्यातील सरकार म्हणजे दिल्लीत मुजरा व गल्लीत गोंधळ असा प्रकार आहे. डान्सबार बंद करत असताना सामाजिक पार्श्वभूमी व केस स्टडी करण्यात आल्या होत्या, या डान्स बारमुळे अनेक कुटुंबं उद्ध्वस्थ झाली, काहींनी शेती विकून डान्स बार मध्ये पैसे उधळले हे पाहूनच डान्सबार बंदी करण्याचा धाडसी निर्णय तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी घेतला होता. डान्सबार सारख्या विकृत्तीला चालना देऊ नये, काँग्रेसचा त्याला विरोध असेल असेही यावेळी निक्षूण सांगितले.

कल्याणमधील ६५ अनधिकृत इमारतींच्या प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुंबई अदानीच्या व बिल्डरच्या घशात घालण्याचे भाजपा सरकारचे षडयंत्र सुरुच आहे. हजारो एकर शासकीय जमीन देऊनही त्यांची भूख भागत नाही म्हणून ते आता सर्वसामान्यांची घरेही गिळत आहेत. कल्याणमधील हजारो लोकांना रस्त्यावर यावे लागणे हे शासन प्रशासनाचा निर्ढावलेपणा आहे. परंतु कुठल्याही परिस्थितीत कष्टकरी, नोकरदार व झोपडट्टीतील लोकांच्या अधिकाराचे हनन होता कामा नये ही काँग्रेसची भूमिका आहे असेही यावेळी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी बी. एम. संदीप, रामकिसन ओझा आदी उपस्थित होते.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, खासगी व धर्मादाय रुग्णालयांना शासकीय आरोग्य योजना राबविणे बंधनकारक विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली माहिती

राज्यातील खासगी व धर्मादाय रुग्णालयांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी करणे बंधनकारक असल्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *