हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, भाजपा महायुती सरकारकडून ‘डुबता महाराष्ट्र’ करण्याचे पाप ड्रग्जचा काळाधंदा, खरात प्रकरण, नाशिक व अमरावतीतील महिलांच्या लैंगिक शोषणाच्या घटना हे गृहविभागाचे अपयश

महाराष्ट्रातील तरुणपिढीला बरबाद करणारे ड्रग्जचे विष आता मुंबई-पुणे सारख्या मोठ्या शहरातच नाही तर तालुक्यापर्यंत पोहोचलेले आहे. गुजरातच्या कांडला बंदरातून महाराष्ट्रापर्यंतच्या ड्रग्ज कॉरिडॉरमधून हे विष आपल्या राज्यात येत आहे. राजकीय आशिर्वादामुळेच ‘उडता पंजाब’ प्रमाणे ‘डुबता महाराष्ट्र’ बनवण्याचे पाप महायुतीने केले आहे. महाराष्ट्राच्या तरुणाईला बरबाद करणाऱ्या महायुती सरकारला जनता कदापी माफ करणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, तुळजापूरची आई तुळजाभवानी हे आपले श्रद्धास्थान आहे, या पवित्र तीर्थक्षेत्राला मोठा अध्यात्मिक व ऐतिहासिक वारसा व परंपरा आहे. परंतु याच शहराचा नगराध्यक्ष ड्रग्ज रॅकेटमधला आरोपी असून त्याला भाजपा उमेदवारी देऊन नगराध्यक्ष बनवते, यातून काय संदेश जातो? दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातेवाईकाच्या शेतात ड्रग्जचा कारखाना सुरु असतो, त्यात खासदार श्रीकांत शिंदेंच्या हस्तक्षेपाने पकडलेले आरोपी सोडून देण्यात आले व प्रकरण दडपण्यात आले. ड्रग्ज सारख्या अत्यंत गंभीर प्रकरणाला जर अशा प्रकारे राजकीय अभय मिळत असेल तर तरुण पिढीला नशेखोरीत लोटण्यास मदतच होणार आहे. वास्तविक पाहता ड्रग्ज प्रकरणात कठोर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना हर्षवर्धऩ सपकाळ म्हणाले की, मुंबईतील नेस्को मध्ये पोलिस स्टेशनच्या समोरच ड्रग्ज व दारु पार्टी होते हे कशाचे द्योतक आहे? हे पोलीस प्रशासन, गृहमंत्री तसेच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे अपयश आहे. फडणवीस यांच्या काळात राज्यातील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. ड्रग्जचा राजरोस धंदा जोरात सुरु असताना अशोक खरात, नाशिकमध्ये आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, अमरावतीमध्येही शेकडो मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. नाशिकच्या प्रकरणात जबरदस्तीने धर्मांतराचा मुद्दा चर्चिला जात आहे. याप्रकरणी एफआयआर सार्वजनिक करण्याची गरज आहे आणि सर्व प्रकरणात कठोर कारवाई केली पाहिजे. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत बिकट बनलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा देऊन राज्याला पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री द्यावा, अशी मागणीही केली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता महाराष्ट्राचा २०४७ पर्यंत जगातील महत्त्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये समावेश

पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, प्रतिभा, स्वच्छ ऊर्जा, सुव्यवस्थित शहरीकरण, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवरून भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *