ईव्हीएम विरोधात लढा पुकारणाऱ्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले.
जयंत पाटील यांनी मारकडवाडीच्या जनतेला संबोधित केले. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, या भागातून निवडून आलेले आमदार उत्तमराव जानकर यांना लाखांचं मताधिक्य मिळाले असते, पण तसं झालं नाही. तसेच मारकडवाडी येथे विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या मनात शंका आहे. ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात आहे. संपुर्ण महाराष्ट्रालाच या निकालांवर शंका असल्याचेही यावेळी सांगितले.
जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी मारकडवाडीची माती अर्पण करून हे आंदोलन आमदार उत्तमराव जानकर यांनी सुरू केले. त्यास प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे. पहिल्यांदा असं घडलं की मतदान पार पडल्यानंतर मतदानाची आकडेवारी एकदा दोनदा नाही तर तीनदा चारदा वाढली आणि त्यात लाखोंनी मतदान वाढले. मत मोजणीच्या दिवशी पोस्टल बॅलेटचा ट्रेंड महाविकास आघाडीसाठी चांगला होता. पण त्यापेक्षा कमी जागी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. दुसऱ्या बाजूला महायुतीसाठी तशी परिस्थिती नव्हती तरी त्यांचे उमेदवार जास्त निवडून आले. हा विरोधाभास कसा ? असा सवालही यावेळी उपस्थित केला.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, निकाल लागला आहे, पुढे न्याय मिळेल की नाही माहिती नाही. पण भारतीय घटनेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला बोलण्याचा अधिकार दिला आहे. मारकडवाडीच्या ग्रामस्थांची इच्छा आहे की त्यांना बॅलेटवर मतदान करून काय खरं, काय खोटं हे बघायचं आहे. मग पोलीस अधिकारी का थांबवत आहे ? सरकार का घाबरत आहे ? यातून पुन्हा शंका निर्माण होत आहे असा आरोपही यावेळी केला.
जयंत पाटील म्हणाले, लाडक्या बहिणींना योजनेतून पैसे मिळाले असतील पण पैसे मिळाले म्हणून महाराष्ट्र विकला जाणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे. मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी मोठे धैर्य दाखवले पाहिजे. त्यांनी एक चळवळ उभी केली. त्यामुळे आता इतरही गावं त्यांच्या गावात हा प्रयोग करू पहात असल्याचेही सांगितले.
पुढे बोलताना जयंत पाटी म्हणाले की, शेवटी, निवडणूक आयोगाने लोकांचा विचार करायला हवा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ईव्हीएमवर न घेता बॅलेटवर घ्याव्यात अशी मागणीही यावेळी केली.
दरम्यान उत्तर जानकर यांनी राजीनामा देण्यास तयार असल्याच्या घोषणेवर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, उत्तमराव ईव्हीएमप्रकरणी तुम्ही राजीनामा द्या पण मी सांगितल्याशिवाय देऊ नका अशी सूचनाही यावेळी केली.
Marathi e-Batmya