कन्हैया कुमार यांची मागणी, देणगी चोरीची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करा, ट्रस्ट बरखास्त करा प्रभूरामाचे दान चोरणे महापाप, कोट्यवधी रामभक्तांच्या श्रद्धेशी चाललेला खेळ काँग्रेस खपवून घेणार नाही

भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हिंदू धर्माशी काहीही देणेघेणे नाही, फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी ते धर्माचा वापर करत असून त्यांचा एकच राम आहे आणि तो म्हणजे नथुराम, प्रभुरामाशी त्यांचे काहीही देणेघेणे नाही. रामभक्तांनी प्रभू रामाला भक्तीभावाने पैसे, सोने, चांदी दान केले, त्यावर भाजपा आरएसएसच्या लोकांनी दरोडा टाकला आहे. प्रभूरामाच्या नावावर कोट्यवधींची चोरी करून श्रद्धेशी खेळ केला आहे, या चोरीची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करून चोरांना कठोर शिक्षा झाली पाहिजे व राम मंदिर ट्रस्ट बरखास्त करा, अशी मागणी काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी केली.

राजीव गांधी भवन येथे विशेष पत्रकार परिषेदत बोलताना कन्हैया कुमार पुढे म्हणाले की, प्रभू रामाच्या मंदिरातील चोरी महापाप व गंभीर गुन्हा आहे, आम्ही धर्माच्या नावावर राजकारण करणार नाही. पण हा कोट्यवधी भक्तांच्या श्रद्धेच्या प्रश्न आहे. राम मंदिरात चोरी करूनही भाजपा आरएसएसचे नेते अत्यंत निर्लज्जपणे चोरीचे समर्थन करत आहेत. दान देऊन विसरा, रामधनावर कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही, हिंदूचे दान आहे हिंदूंनी घेतले, अशी बेताल वक्तव्य करत आहेत. ‘राम को लाये है’ म्हणण्याची हिम्मतच कशी होते. प्रभूरामाला काय भाजपाने आणले आहे का, ते तर हजारो वर्षांपूर्वीच आले आहेत. गांधी हत्येनंतर आरएसएसने नथुरामशी काही संबंध नाही म्हणत हात वर केले आता राम मंदिरातील चोरी पकडली की रा. स्व. संघाने चंपत राय यांच्यापासून हात झटकले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर पायाभरणी समारंभ व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा मोठा गाजावाजा केला, श्रेय घेण्यासाठी सर्वात पुढे होते, पण आता चोरी उघड झाली तर एक शब्द काढत नाहीत. ५६ इंच छातीच्या मोदींची २.५ इंच जीभ हलली नाही. पेपर लिक झाले तरी मोदी गप्प, राम मंदिरात चोरी झाली तरीही मोदी गप्पच असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना कन्हैया कुमार म्हणाले की, राम मंदिरातील चोरी प्रकरणी स्थापन केलेल्या एसआयटीवर कोणाचाही विश्वास नाही. कारण ही एसआयटी धुळफेक आहे. एसआयटी प्रमुखावर ४२० चा गुन्हा दाखल झालेला आहे, तो काय चोरी पकडणार आहे. एसआयटी चौकशीच संशयास्पद आहे. चौकीदारच चोराला सामिल झालेला आहे तर मग चोर कसा पकडला जाणार म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करा व सर्व दोषींना पकडा. पैसे मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांना पकडले जात असून मोठे मासे मात्र मोकाट असल्याचा आरोपही यावेळी केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना कन्हैया कुमार म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचे कोणतेही राजकीय अस्तित्व नाही, ते अमित शाह यांना सरेंडर झालेले आहेत. चंदा दो, धंदा लो, मॉडेल वर त्यांचे राजकारण सुरु आहे. अमित शाह, अदानी विरोधात बोलण्याची हिम्मत शिंदेंनी दाखवावी. सरेंडर करणारे काही पक्ष एका आघाडीत तर देशासाठी लढणारे पक्ष दुसऱ्या आघाडीत आहेत. देशाचा स्वाभिमान, लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी लढणारी वेगळी आघाडी आहे. काँग्रेस देशहितासाठी लढत आहे. या लढ्यात जे येतील त्यांना सोबत घेऊन काँग्रेसची लढाई सुरु आहे असल्याचे सांगितले.

शेवटी बोलताना कन्हैया कुमार म्हणाले की, इंग्रजांनी बांधलेले पुल दीड दोनशे वर्षानंतरही अजून भक्कम आहेत. काँग्रेस सरकारने १६ वर्षांपूर्वी बांधलेला वांद्रे वरळी सी लिंकसुद्धा आजही मजबूत आहे पण दोन महिन्यापूर्वी बांधलेला ७ हजार कोटी रुपयांचा मिसिंग लिंक मात्र मिसिंग असल्याची टीका राज्य सरकारवर केली.

या पत्रकार परिषदेला मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस, प्रवक्ते शितल म्हात्रे, रवी बावकर, निजामुद्दीन रायन, मंदार पवार, इत्यादी उपस्थित होते.

About Editor

Check Also

नरहरी झिरवाळ यांचे आश्वासन, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी अतिरिक्त निधीसाठी पाठपुरावा सुरू वाढत्या महागाईचा विचार करून शिष्यवृत्ती वाढविण्याचा विचार

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती वितरित करण्यासाठी आवश्यक अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असून, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *